Pune | Sat, 25 April 2026

No Ad Available

‘मानस’ प्रकल्पातून बालकांच्या मानसिक आरोग्यास बळकटी – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक

Admin | 1 views
‘मानस’ प्रकल्पातून बालकांच्या मानसिक आरोग्यास बळकटी – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक

मुंबई, दि.२५ : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व मनमुक्त फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानस प्रकल्प-सुरक्षित बालपण, समृद्ध महाराष्ट्र’ अंतर्गत बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असून, याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती राज्य हक्क बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

सद्यस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये वाढता तणाव, नैराश्य आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या जतनासाठी समग्र दृष्टिकोन अवलंबण्यात येणार असून, त्यात पालक व शिक्षकांचाही सक्रिय सहभाग राहणार आहे. या विषेश अभियानासाठी लवकरच जिल्ह्यांची निश्चिती करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, भावनिक बुद्धिमत्ता, तणाव व्यवस्थापन, निर्णयक्षमता व नेतृत्वगुण विकसित करण्यावर या प्रकल्पाचा भर असेल. इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असून, तो मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केला जाणार आहे. यामध्ये ॲक्टिव्हिटी वर आधारित आणि शिकण्यातून प्रयोगशील अनुभव घेण्याच्या पद्धतीचा वापर केला जाईल.

पालकांसाठी ‘कॉन्शियस पॅरेन्टिंग’ व संवाद कौशल्य प्रशिक्षण, तर शिक्षकांसाठी भावनिक सहाय्य व वर्ग व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता व भावनिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल, तसेच शाळांमध्ये तणावमुक्त व सहकार्यशील वातावरण निर्माण होईल.

पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तारण्याचा मानस असून, शालेय शिक्षण व्यवस्थेत मानसिक आरोग्याचा समावेश करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. पुराणिक यांनी सांगितले. या उपक्रमात सर्व शाळा, पालक व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आयोगामार्फत करण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ


Join WhatsApp