
अहिल्यानगर, दि. २५ एप्रिल :- श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पाण्याचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या यात्रेतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडकुते, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, प्रवीण कोल्हे, देविदास महाराज, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंझुर्डे, दयानंद महाराज कोरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला. सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्रनिर्मिती ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. २९ वर्षांच्या आदर्श शासनातून लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धन, धर्मशाळांची उभारणी, मंदिरांचे जीर्णोद्धार, नद्यांवर घाटांची निर्मिती, आदर्श करव्यवस्था तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती देऊन समाजहिताचे कार्य केले. त्या काळात महिला सक्षमीकरणालाही त्यांनी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्य शासनही लोककल्याण व विकासासाठी कटिबद्ध आहे. मागील चार वर्षांत सुमारे सव्वा चार लाख कोटी रुपयांच्या २२३ जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, यामुळे ३२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणीपुरवठा, नद्यांचे पुनरुज्जीवन, दुष्काळग्रस्त भागांकडे पाणी वळविणे तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प-सभापती प्रा. राम शिंदे
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ ही त्यांच्या कार्याला उजाळा देणारी असून या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी या संकल्पनेतून चौंडी येथून निघालेली ही यात्रा जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून लोककल्याणकारी भावना प्रकर्षाने जाणवते. समाजकारण करताना त्यांनी जलसंवर्धनाचे अनेक प्रकल्प राबवले असून आजही ती कामे सुस्थितीत आहेत. शेती विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘जलयुक्त शिवार’ अभियानातून सुमारे २२ हजार गावांमध्ये साडेसहा लाख कामे करून अनेक भाग टंचाईमुक्त करण्यात यश आले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘एल निनो’सारखी आव्हाने समोर येत असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर आणि वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
सर्वप्रथम या जलयात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र चौंडी येथून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि सीना नदीतील पवित्र जलपूजन करून कलश घेऊन यात्रा महेश्वरकडे मार्गस्थ झाली.
यावेळी ह.भ.प. जंगले महाराज यांचेही समयोचित भाषण झाले.
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरीच्या उगमस्थानातून जलकलश घेऊन यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा नाशिक, सिन्नर मार्गे संगमनेर येथे पहिला मुक्काम करेल. त्यानंतर लोणी मार्गे शिर्डी येथे पोहोचेल. चौंडी येथून निघालेली यात्रा अहिल्यानगर येथे पहिला व शिर्डी येथे दुसरा मुक्काम करेल. तिसऱ्या दिवशी दोन्ही यात्रा एकत्र येऊन संभाजीनगरमार्गे घृष्णेश्वर येथे मुक्कामी राहतील. चौथ्या दिवशी कन्नड-चाळीसगाव मार्गे धुळे येथे मुक्काम होईल. तर दि. २९ एप्रिल २०२६ रोजी महेश्वर येथे पोहोचून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलकलश स्वीकारल्यानंतर यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
000
