Pune | Sat, 25 April 2026

No Ad Available

जिल्ह्याच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Admin | 6 views
जिल्ह्याच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. २५ : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियतव्यय, विविध यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात येणारी विकासकामे, त्याची अंमलबजावणी आदीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला.

नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीला आमदार देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसूमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, कुशाग्र पाठक, योगेश वाघाये, आनंद रेड्डी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुंभरे यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, एप्रिल ते जून 2026 या कालावधीत यंत्रणांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करावे. या प्रस्तावात आपल्या विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात कोणकोणती विकास कामे करण्यात येणार आहे,  त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करणार, या बाबींचा समावेश असावा. तसेच विविध यंत्रणांनी जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे.

महावितरणने तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावे 100 टक्के सौर उर्जेवर करावी. कर्ज वितरणाबाबत बँकांची तक्रार येणार नाही. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करावे. आकांक्षित तालुका जीवतीमध्ये शिक्षण, आरोग्य या बाबींवर विशेष फोकस करावा. क्रीडा विभाग खेळाडू तसेच तरुणांना खेळण्यासाठी दीर्घकाळ टिकेल, अशी कामे घ्यावीत. वैद्यकीय रुग्णालयातील सर्व उपकरणे अद्यावत ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात पावसाळ्याच्या दिवसात आवश्यक औषधी उपलब्ध ठेवाव्या. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, शौचालय स्वच्छ ठेवावे. अंगणवाड्यांमध्ये सुद्धा पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था असावी. ज्या गावांना रस्त्यांची अत्यंत गरज आहे, अशा गावांसाठी ग्रामीण रस्ते त्वरित करावे. त्यासाठी निधी देण्यात येईल. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात चांगल्या अभ्यासिका तयार कराव्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

यावेळी आमदार भोंगळे म्हणाले, नियमित कर्ज भरणाऱ्यांना बँकांनी लगेच कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने त्वरित बँकांना सूचना कराव्या. सर्व तालुका क्रीडा संकुलामध्ये कुस्ती आणि कबड्डीसाठी मॅट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सादरीकरण केले.

०००००००


Join WhatsApp