Pune | Sun, 21 June 2026

No Ad Available

विश्वाशी जोडणारी जीवनपद्धती म्हणजे योग -निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल

Admin | 5 views
विश्वाशी जोडणारी जीवनपद्धती म्हणजे योग -निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल

नवी दिल्ली, दि. २१ : योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा व्यायाम नसून मन, शरीर आणि आत्म्याला ब्रह्मांडाच्या नैसर्गिक लयीशी जोडणारी जीवनपद्धती आहे. योग म्हणजे आपल्या अस्तित्वाला विश्वाशी जोडणारे प्रभावी माध्यम असून तो निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा आधार आहे, असे प्रतिपादन निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी केले.

नवीन महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र सदन, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलापत्ते, उपनिवास अभियंता जमुनाप्रसाद गंगवार तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिजित गोडबोले, विवेक गर्गे, अभिजित पाठक आणि नितीन सरदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘निरोगी वार्धक्यासाठी योग ही जागतिक संकल्पना’ केंद्रस्थानी ठेवून विशेष योगाभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या वयातही शारीरिक सुदृढता, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनशैली जपण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे योग प्रशिक्षक आदित्य देव यांनी योगाचे वैज्ञानिक महत्त्व, आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता सांगत दैनंदिन व्यस्त जीवनातून काही मिनिटे योगासाठी दिल्यास शरीर आणि मन दोन्ही सुदृढ व प्रसन्न राहत असल्याचे प्रतिपादीत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शक अमर यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

या योगसत्राची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर सूक्ष्म व्यायाम, ग्रीवा चालन, कटी चालन आणि घुटना संचलन यांचा सराव करण्यात आला. पुढे सहभागींनी विविध आसनांचा उत्साहाने अभ्यास केला.

समारोप सत्रात कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायामासह ध्यान प्रक्रियेचा सराव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः या विश्वकल्याणाच्या मंगल प्रार्थनेने झाली.

यावेळी उपस्थितांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करत निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. वैयक्तिक आरोग्य, मानसिक संतुलन आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी योग ही काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

00000


Join WhatsApp