Pune | Wed, 17 December 2025

No Ad Available

वृक्ष संवर्धनासाठी नाशिककरांनी योगदान द्यावे – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

Admin | 3 views
वृक्ष संवर्धनासाठी नाशिककरांनी योगदान द्यावे – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरात 15 हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. याबरोबरच ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

हरित नाशिक उपक्रमांतर्गत आज सकाळी मखमलाबाद रस्त्यावरील भोईर मळ्यात नाशिक महानगरपालिकेतर्फे विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्यासह महंत हरिगिरीजी महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, शंकरानंद महाराज, जनार्दन हरी महाराज, स्वामी भागवतानंद आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेला मागील कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि दुर्घटना विरहित झाला. त्याची जगाने दखल घेतली. आगामी कुंभमेळा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि स्वच्छ राहील, अशी दक्षता घेण्यात येईल.

कुंभमेळा हा आपली अस्मिता आहे. नाशिक शहराला आगळे वेगळे महात्म्य लाभले आहे. तपोवनात साधू, महंतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येणार आहेत. या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येईल. तसेच आई वडिलांच्या नावाने एका रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. त्यासाठी नाशिककरांनी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी सामाजिक दायित्व निधीची मदत घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर म्हणाल्या की, नाशिक महानगरपालिकेतर्फे एक लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. यावेळी श्री हरिगिरीजी महाराज, स्वामी
भागवतानंद, स्वामी शंकरानंद, जनार्दन हरी महाराज, शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे स्वागत केले. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्ता कामाचे भूमिपूजन

सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत खडकाळी सिग्नल ते आयटीआय पर्यंतच्या रस्ता विकसित करण्याच्या कामाचे मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामावर 79.50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यावेळी आमदार राहुल ढिकले, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून मुंबई नाका ते नेल्सन इस्पितळापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण आणि संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार श्रीमती फरांदे, आमदार श्री. ढिकले आदी उपस्थित होते.

00000


Join WhatsApp