Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत

Admin | 1 views
नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत

संमेलनाच्या नियोजनासाठी साहित्यिक, मान्यवरांशी साधला संवाद

नाशिक, दि. 15 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा): कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहराला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होईल. त्यासाठी सर्व नाशिककरांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी येथे केले.

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आय. एम. आर. टी. सभागृहात 4 थे विश्व मराठी संमेलन आयोजनाबाबत साहित्यिकांशी संवाद साधतांना मंत्री डॉ. सामंत बोलत होते. वेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, अवर सचिव नितीन डोंगरे, उर्मिला धादवड, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक रमेश पिंगळे, नंदकुमार बनकर, अप्पासाहेब गडाख यांच्यास‍ह साहित्यिक, कवी, लेखक आदी उपस्थित होते.

येत्या 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत विश्व मराठी संमेलन होईल. या संमेलनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम होतील. त्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात येईल. संमेलनादरम्यान मराठी भाषा व साहित्याचा विकास, जागतिकीकरणाच्या युगातील मराठीची भूमिका, तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, शिक्षणातील मातृभाषेचे स्थान तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन या विषयांवर विविध परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच संमेलनात कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, नाट्यप्रयोग, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद तसेच युवा पिढीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी साहित्य, कला व परंपरेचे दर्शन घडविणारी विविध प्रदर्शनेही या निमित्ताने भरविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर विखुरलेल्या मराठी भाषिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे तसेच नव्या पिढीत मराठीबाबत अभिमान निर्माण करणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

या संमेलनासाठी परदेशातून साहित्यिक हजर राहणार आहेत. यापूर्वीचे संमेलन पुणे येथे झाले. या संमेलनात पुस्तक आदान प्रदान हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या संमेलनातही हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी दहा रुपये वर्गणी ठेवण्यात येईल. या संमेलनाच्या मुख्य मंडपाला कवी कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्यात येईल. अन्य दालनांना मान्यवरांची नावे देण्यात येतील. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिन तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला विशेष महत्व असणार आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसा हा सोहळा ठरणार असून नाशिकची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषा विभागातर्फे 35 जणांना साहित्य पुरस्कार, विश्व मराठी संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार व नाशिकमध्ये एक विशेष पुरस्काराचे वितरण या संमेलनात करण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी पुरस्कार्थीची नावे घोषित करण्यात येतील. संमेलन पूर्व 26 फेब्रुवारी रोजी मराठी बोलीभाषांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे व सांगता मराठीतील प्रसिद्धी नाटक आमने-सामने याने होईल. 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. सांयकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी पुरस्कार विजेत्यांबाबत परिसंवादाचे आयेाजन केले आहे. 28 फेब्रुवारी रोजी मनाचे श्लोक, लोककला, चित्रपट कार्यशाळा, एआय व मराठी भाषा, वारकरी संप्रदाय साहित्यप्रकार असे नानाविध कार्यक्रम होणार असून प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. ठाकरे म्हणाले की, विश्व मराठी संमेलन होत आहे ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब आहे. संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. यावेळी उपस्थित प्रा. सायली आचार्य, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. गिरीश पाटील, विश्वास ठाकूर, पिऊ शिरवाडकर, धनंजय बेळे, श्रीकांत बेणी सतीश बोरा, प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, दिनेश पैठणकर, सुरेश पवार आदींनी विविध सूचना केल्या.

4 थे मराठी विश्व संमेलन नाशिक कार्यालयाचे उद्घाटन

यावेळी मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारातील मराठी विश्व संमे़लन नाशिक कार्यालयाचे उद्घाटन तसेच मराठी विश्व संमेलनाच्या संकेतस्थळाचे कळ दाबून उद्घाटन संपन्न झाले. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.ठाकरे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. भोसले व मान्यवर उपस्थित होते.

000000


Join WhatsApp