Pune | Thu, 23 April 2026

No Ad Available

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 3 views
उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारतातील डेन्मार्कचे राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीदरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांच्यासह फर्स्ट सेक्रेटरी (ट्रेड पॉलिसी अँड इकॉनॉमिक अफेअर्स) मॅथियास एमिल बेंग्टसन तसेच मानद डेन्मार्क वाणिज्य दूतावास, मुंबईचे उपमहावाणिज्यदूत कन्नन नटराजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाची माहिती डेन्मार्कच्या प्रतिनिधींना दिली. वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र आणि देशाला जागतिक स्तरावर सागरी महासत्ता बनण्याची संधी मिळेल. तसेच लॉजिस्टिक्स आणि निर्यात वाढीस मोठे बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात जलवाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी वॉटर टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण प्रणाली विकसित करून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक फेरी आणि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तंत्रज्ञानासाठी डेन्मार्कच्या आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी करण्यास राज्य शासन इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डेन्मार्कने त्यांच्या किनारी भागात आणि अल्प अंतराच्या फेरी सेवांमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरले असून, अशा तंत्रज्ञानाचा मुंबई–कोकण किनारपट्टीसाठीही मोठा उपयोग होऊ शकतो, असे डेन्मार्कचे राजदूत क्रिस्टेन्सेन यांनी सांगितले. तसेच डेन्मार्कच्या सुमारे ६० कंपन्या मुंबई व पुणे परिसरात उत्पादन, रिटेल, सेवा, शिपिंग आदी क्षेत्रांत कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत–डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत, विशेषतः सागरी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य महत्त्वाचा भागीदार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

००००००

एकनाथ पोवार / सं. स.


Join WhatsApp