
नागपूर, दि. १२ : संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने आयोजित संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा – 2025 हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संविधानाची समज वाढविण्यासाठी, तज्ज्ञ मार्गदर्शन, अनुभवात्मक शिक्षण आणि अभ्यास साहित्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागरूक, उत्तरदायी आणि सशक्त नागरिक होण्याची संधी मिळणार असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
दीक्षाभूमीजवळील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे प्रत्यक्ष तर शिक्षण संचालक, अल्पसंख्याक विकासाचे अवर सचिव, इतर मागासवर्ग विभागाचे सह सचिव, उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक, तंत्र शिक्षणचे सह संचालक, महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ अधिकारी, राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
अशी असणार स्पर्धा :
संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025 महाराष्ट्र राज्यातील 8 वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली गेली आहे. ही स्पर्धा पुर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असेल. विद्यार्थी www.yuvacareer.com या संकेतस्थळावर भेट देऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती, नोंदणी प्रक्रिया, ऑनलाईन प्रशिक्षण, तसेच प्रश्नमंजुषेची सर्व माहिती मिळवू शकतात.
भाषा निवडः
संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025 ही मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषांमध्ये आयोजित केली जाईल. विद्यार्थी इच्छेनुसार कुठलीही एक भाषा निवडू शकतात.
शुल्कः
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 99 रुपये शुल्क निश्चित केले गेले आहे. शाळा, महाविद्यालये, वसतिगृह आणि आश्रमशाळांना हे शुल्क भरावे लागेल. फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतीत.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन :
सर्व प्रक्रिया www.yuvacareer.com संकेतस्थळावर ऑनलाइन पार पडणार आहे. अधिकृत संकेतस्थळावरच तपशील उपलब्ध असणार आहे. फेक लिंक आणि अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका, असे ते म्हणाले.
पुरस्कार
प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार 51 हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार 11 हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करेल आणि त्यांना भविष्यातील कार्यात प्रेरणा देईल.
नोंदणी कालावधी व परीक्षा
31 डिसेंबर पर्यंत नोंदणी कालावधी आहे. नोंदणी फक्त www.yuvacareer.com या अधिकृत संकेतस्थळावर केली जाऊ शकते. मॉक टेस्ट: 20 जानेवारी 2026, पहिली फेरी क्विझः 22 जानेवारी 2026६ तर अंतिम क्विझः प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 असणार आहे.
000000
