Pune | Thu, 23 April 2026

No Ad Available

निर्यातदारांसाठी भव्य रिव्हर्स बायर-सेलर मीटचे आयोजन

Admin | 5 views
निर्यातदारांसाठी भव्य रिव्हर्स बायर-सेलर मीटचे आयोजन

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित तर्फे महाराष्ट्र शासनाच्या रॅम्प (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएवएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत चौथ्या रिव्हर्स बायर-सेलर मीट चे आयोजन करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रम इंडिया एसएमई फोरम (आयएसएफ) यांच्या सहकार्याने 27 व 28 एप्रिल 2026 रोजी द लीला हॉटेल, अंधेरी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा दोन दिवसीय उपक्रम निर्यात-केंद्रित एमएसएमई  उद्योगांसाठी प्रभावी व सुव्यवस्थित व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, जागतिक स्तरावरील विश्वासार्ह खरेदीदारांशी थेट संवाद, उत्पादने व सेवांचे सादरीकरण तसेच निर्यातवाढीसाठी नव्या संधींचा शोध घेण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. एचएसएन कोड आधारित अचूक मार्केट मॅचिंग प्रणालीमुळे एमएसएमई  निर्यातदार आणि विदेशी खरेदीदार यांच्यात लक्ष्यित जुळवणी साधली जाणार आहे.

या उपक्रमासाठी सुमारे 40 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची निवड करण्यात आली असून ते रवांडा, दक्षिण आफ्रिका, जपान, जॉर्डन, हंगेरी, घाना, कॅमेरून, इटली, ऑस्ट्रिया, पापुआ न्यू गिनी, युगांडा, झांबिया, जर्मनी आदी देशांतून सहभागी होणार आहेत.

विविध क्षेत्रांचा व्यापक सहभाग
या कार्यक्रमात कृषी व अन्न उत्पादने, ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व ऊर्जा, रसायने व प्लास्टिक, औषधनिर्मिती व आरोग्यसेवा, वस्त्रोद्योग व लेदर, आयटी व डिजिटल सेवा, बांधकाम व पायाभूत सुविधा, वित्तीय व व्यावसायिक सेवा तसेच शिक्षण व कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांतील एमएसएमई  उद्योग सहभागी होणार आहेत. 200 पेक्षा अधिक निर्याताभिमुख एमएसएमई  उद्योगांचा सहभाग असून पूर्वनियोजित बी2बी बैठका हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल.

कार्यक्रमाची रूपरेषा
महाराष्ट्रातील एमएसएमई  निर्यात : संधी व परिसंस्था’ या विषयावर परिसंवाद व तज्ज्ञ पॅनेल चर्चा आयोजित करण्यात येईल. या चर्चेत डीजीएफटी, कस्टम्स, ईसीजीसी, एक्झिम बँक, अमेझॉन, ॲरॉमेक्स आणि टाटा एआयजी यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यानंतर निर्यात वित्तपुरवठा : कर्ज व व्यापार सुलभीकरण या विषयावर विशेष सत्र एक्सिस बॅंकेतर्फे आयोजित करण्यात येईल.

प्रदर्शन
कार्यक्रमादरम्यान पैठणी साड्या, एमएसएसआयडीसी  उत्पादने, बांबू उत्पादने, अन्न उत्पादने तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मध उत्पादने यांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

अपेक्षित परिणाम
या उपक्रमाचा मुख्य उद्देश एमएसएमई  उद्योगांना नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देणे तसेच ओडीओपी व जीआय उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा आहे. यासोबतच जागतिक पुरवठा साखळीत एमएसएमई  उद्योगांचा दीर्घकालीन सहभाग वाढविणे हाही प्रमुख हेतू आहे. याशिवाय क्षमता विकास कार्यशाळा, नोंदणी व परवाना मार्गदर्शन, निर्यात सल्ला, व्यापार वित्तपुरवठा, ईएसजी प्रमाणपत्रे तसेच उद्योगपती व तज्ज्ञांशी संवाद यांद्वारे एमएसएमई  क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे, असे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांनी कळविले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 


Join WhatsApp