Pune | Tue, 16 June 2026

No Ad Available

मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 5 views
मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मुंबई मेट्रो’ हे मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील उत्पादनांना मुंबईमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन स्थानकावर वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), मुंबई महापालिका आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे,तसेच वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई मेट्रो-3 ही शहराची नवी जीवनवाहिनी आहे.आशियातील सर्वात लांब एकेरी भूमिगत मेट्रो आहे. ही मेट्रो केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासालाही चालना देणारे व्यासपीठही आहे. मेट्रो स्थानकांवर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील उत्पादने थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तयार केलेले दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ आता मुंबईसारख्या बाजारपेठेत या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळण्याबरोबरच ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत. मेट्रो स्थानकांवरील अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

मेट्रो स्थानकावर सुरू झालेला वारणा स्टॉल हा केवळ व्यावसायिक उपक्रम नसून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. वारणा समूहाने दुग्ध व्यवसायाबरोबरच शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य देशासाठी आदर्श असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा परिवाराचे अभिनंदन केले.

आमदार कोरे म्हणाले की, वारणा समूहाच्या वतीने सुमारे दीड लाख शेतकरी उत्पादकांकडून दररोज दूध संकलित केले जाते आणि त्याचा मोबदला नियमितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला जातो. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुग्धजन्य पदार्थांना मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळावा, यासाठी मेट्रो स्थानकांवरील स्टॉल महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मुंबईच्या ग्राहक वर्गाला दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देतानाच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ देण्याचे काम या स्टॉलच्या माध्यमातून होणार आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

 


Join WhatsApp