Pune | Tue, 16 June 2026

No Ad Available

मिफ्फ-२०२६ निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

Admin | 5 views
मिफ्फ-२०२६ निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

मुंबई, दि. १६ : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, 16 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात होणार आहे.

हा महोत्सव 16 ते 20 जून 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.30 वाजता रंगणार असून, 19 जून रोजी मात्र सायंकाळी 4 ते 6 या वेळेत चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शकांच्या कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मंगळवार, 16 जून 2026 रोजी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’ व ‘नेहमीच’  हे लघुपट तर  फड हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. बुधवार, 17 जून रोजी ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्पलेट’, ‘अर्जुन’ हे लघुपट; तर ‘महाल्ले’ हा माहितीपट दाखविण्यात येईल. गुरुवार, 18 जून रोजी ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डीयर 202’, ‘17 वे वर्ष’ हे लघुपट; तर ‘फड’ हा माहितीपट दाखविण्यात येईल. शुक्रवार, 19 जून  रोजी ‘पाणखोल’, ‘अर्जुन’, ‘डोंगर पाणी’, ‘दारवठा’ हे लघुपट दाखविण्यात येईल. शनिवार, 20 जून 2026 रोजी ‘वाघ’, ‘सापशिडी’, ‘मुक्ता’, ‘दारवठा’ हे लघुपट दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपटांमधून ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक परंपरा आणि समकालीन प्रश्नांचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडले जाणार आहेत.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

 


Join WhatsApp