
नांदेड दि. २४ : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेडच्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. २४) उत्साहात पार पडला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. “मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूर्वजांनी उभी केलेली सहकार चळवळ महाराष्ट्राची ओळख जगभर पोहोचवणारी ठरली आहे. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळणे महत्त्वाचे असून, त्यासाठी बँकांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, बँकेचे उपाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, नरेंद्र चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संचालक कैलास गोरठेकर, गोविंदराव नागेलीकर, बाळासाहेब रावणगावकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपनिबंधक शंभूराज हिरे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक व विविध मान्यवर, शेतकरी, नागरीक आदींची उपस्थिती होती.

डॉ. शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी पद्मश्री स्व. श्यामराव कदम व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मंत्री पाटील म्हणाले, सहकारी बँका चालविताना अनेक अडचणी येतात. मात्र त्या अडचणींवर मात करून नांदेड जिल्हा बँकेने प्रगतीचा मार्ग धरला आहे. आगामी काळात बिंदूनामावलीनुसार पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत तंत्रज्ञान व खतांचा योग्य वापर करावा आणि इतर बँकांकडे न वळता जिल्हा बँकेशी व्यवहार वाढवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
बँकेच्या विकासात माझाही खारीचा वाटा – अशोक चव्हाण
खासदार चव्हाण यांनी जिल्हा बँकेच्या पुनरुत्थानाचा इतिहास उलगडला. जिल्हा बँक डबघाईस आली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बँक बंद करण्याच्या विचारात होते. मात्र, शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मी बँकेला जिवंत ठेवण्याची विनंती केली आणि गॅरंटी घेतली. मुख्यमंत्री असताना १२५ कोटींच्या कर्जाचे रुपांतर अनुदानात केल्यामुळे बँक टिकली. त्यामुळे या बँकेच्या विकासात माझाही खारीचा वाटा आहे, असे ते म्हणाले.
भोकर बाजार समितीने बँकेच्या इमारतीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सभापती जगदीश पाटील व संचालक मंडळाचे त्यांनी आभार मानले.
प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी तर आभार संचालक रामचंद्र मुसळे यांनी मानले.
०००
