
नाशिक, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यातूनच विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीवर ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ च्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, असे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आयोजित बैठकीत मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. एस. पवनदत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, कार्यकारी अभियंता वैभव भागवत (पालखेड), मनोज ढोकचौळे (नांदूर मध्यमेश्वर), लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश पाटील, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, आचार्य तुषार भोसले यांचेसह नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, जलव्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रमांतर्गत ही जलयात्रा काढण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग वाढविणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र चौंडी (जि. अहिल्यानगर) आणि गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी म्हणजे २५ एप्रिल २०२६ रोजी जलयात्रेला प्रारंभ होईल. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलयात्रेचा शुभारंभ होणार आहे. श्रीक्षेत्र चौंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित राहतील.

चौंडी येथून निघालेली जलयात्रा अहिल्यानगर येथे मुक्काम करेल. त्र्यंबकेश्वर येथून निघालेली यात्रा नाशिक, सिन्नर व संगमनेर येथे मुक्काम करेल. २६ एप्रिल रोजी शिर्डी येथे एकत्र येईल. त्यानंतर २७ एप्रिल रोजी शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर मार्गे घृष्णेश्वर येथे मुक्काम असेल. २८ एप्रिल रोजी यात्रा कन्नड, चाळीसगाव व धुळे येथे पोहोचेल. त्यानंतर २९ एप्रिल रोजी धुळे ते महेश्वर (मध्य प्रदेश) असा प्रवास करून जलयात्रेचा समारोप होईल.
त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणा-या जलयात्रेचे शहरात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून स्वागत होणार आहेत. नाशिक शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जलयात्रेत सहभागी व्हावे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी आवश्यक मानक कार्यपद्धतीने नियेाजन करावे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता उष्माघात व आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत. जलयात्रेदरम्यान नागरिकांसाठी मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेटस् उपलब्ध ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गर्दी नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेने नियोजन करावे. तसेच सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यादृष्टीने योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना देत जलयात्रा राज्यातील जलसंवर्धन चळवळीला नवे बळ देईल आणि नागरिकांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता वाढवून व्यापक लोकसहभाग निर्माण करेल, असा विश्वास मंत्री श्री. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. कपूर यांनी जलयात्रा मार्गक्रमण, स्वागताची ठिकाणे, सुरक्षितेबाबत केलेल्या उपयायोजना याबाबत माहिती जाणून घेतली. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यात्रेच्या मार्गावरील आरोग्य यंत्रणेने सजग राहण्याच्या सुचना दिल्या. यात्रा मार्गावरील वाहतूकीचे व्यवस्थापन व सुरक्षिततेबाबत पोलिस महानिरीक्षक श्री. कराळे यांनी माहिती दिली. अधीक्षक अभियंता श्री. गोवर्धने यांनी जलयात्रेसाठी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण यावेळी केले.
0000000
