Pune | Fri, 19 June 2026

No Ad Available

भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Admin | 3 views
भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

  • अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन 

 नागपूर, दि. १९ – देशाला भविष्यात संरक्षणसज्ज ठेवायचे असेल तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक गरजांवर स्वतःचे नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्र इंडियाचा अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्प भारताचे आयात अवलंबित्व कमी करून देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण, एरोस्पेस, विमाननिर्मिती, क्षेपणास्त्र कार्यक्रम, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या अल्युमिनियम मिश्रधातूंच्या निर्मितीला मोठी चालना मिळेल आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे व्यक्त केला.

यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार, संयुक्त सचिव गरिमा भगत, यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांच्यासह संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, हा प्रकल्प म्हणजे आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनक्षमतेला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्र कार्यक्रम, अंतराळ संशोधन, विमान उद्योग, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेले मोठ्या आकाराचे व गुंतागुंतीचे अल्युमिनियम मिश्रधातू घटक या प्रकल्पातून तयार करता येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या अशा अल्युमिनियम घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अंतराळ कार्यक्रमांसाठी हलके, मजबूत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकणारे धातू आवश्यक असतात. अशा धातूंची निर्मिती विशेष प्रक्रियेद्वारे केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करून संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशात देशात विकसित झालेल्या संरक्षण उपकरणांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मोठ्या यंत्रणांची खरी ताकद हजारो लहान-मोठ्या घटकांमध्ये दडलेली असते. अल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेसमुळे या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने होईल, असे ते म्हणाले.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, २०१४ मध्ये देशांतर्गत संरक्षण उत्पादन सुमारे ४६ हजार कोटी रुपये होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात विक्रमी १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संरक्षण क्षेत्रातील निर्यातही २०१४ मधील एक हजार कोटींवरून वाढून ३८ हजार ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांसाठी निश्चित केलेले तीन लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि ५० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वीच साध्य होईल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

नागपूर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षण क्षेत्रात भारताची वाढती ताकद जगभरात मान्य होत असून केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देश जागतिक संरक्षण उत्पादन निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल. विदर्भात विशेषतः नागपूरचा परिसर हा ‘डिफेंस मॅनुफॅक्चरिंग इकोसिस्टिम’मध्ये देशाचे एक महत्वाचे अंग म्हणून विकसित होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

आत्मनिर्भरतेकडे देशाने एक सक्षम पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत असे दोन मंत्र आपल्याला दिले आहेत. विकसित भारताकडे वाटचाल करायची असल्यास आत्मनिर्भर भारत विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशाने आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आज संपूर्ण जग आपल्या देशाची प्रगती पाहून आश्चर्यचकित झाले आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात अत्यंत कमी वेळात प्रगती केली असून संरक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा उत्पादक देश झाला आहे. विशेषतः ॲापरेशन सिंदूरमध्ये साऱ्या जगाने देशाची सामरिक क्षमता पाहिली आहे. हा नवा भारत असून पूर्ण क्षमतेने व आत्मनिर्भरतेने उभा असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान अल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे आभार अंबाझरी आयुध निर्माणीचे कार्यकारी संचालक अजयकुमार येरपुडे यांनी मानले.

00000

 


Join WhatsApp