Pune | Fri, 19 June 2026

No Ad Available

‘जय महाराष्ट्र’ मध्ये प्रा. मृदुला दाढे यांची विशेष मुलाखत

Admin | 3 views
‘जय महाराष्ट्र’ मध्ये प्रा. मृदुला दाढे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 19 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका तथा ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रा. मृदुला दाढे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. भारतीय शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत आणि चित्रपट संगीताचा समृद्ध वारसा, त्याचा ऐतिहासिक प्रवास, समाजजीवनाशी असलेले नाते तसेच डिजिटल युगातील संगीत क्षेत्रासमोरील संधी आणि आव्हाने या विविध विषयांचा सखोल उहापोह या मुलाखतीत करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 23 जून 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या या विविध समाजमाध्यमांवरही ती उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR⁠�

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR⁠�

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR⁠�

संगीताचा इतिहास, परंपरा आणि समाजजीवनाशी असलेल्या त्याच्या घट्ट नात्याचा अभ्यास करणाऱ्या प्रा. दाढे यांनी या मुलाखतीत भारतीय संगीताच्या उत्क्रांतीचा प्रवास रसिकांसमोर उलगडला आहे. विविध घराणी, संगीत परंपरा आणि गुरू-शिष्य परंपरेचे जतन व संवर्धन यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. तसेच भाषा आणि संगीत यांच्यातील अतूट संबंध स्पष्ट करत संस्कृतपासून आधुनिक भारतीय भाषांच्या विकासात संगीताने बजावलेली भूमिका त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने विशद केली आहे.

शब्द, सूर आणि लय यांच्या सुंदर संगमातून मानवी भावविश्व कसे समृद्ध होते, यावर भाष्य करताना त्यांनी संगीताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. चित्रपट संगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा परस्परसंबंध, लोकसंगीतातून मिळणारी सर्जनशील प्रेरणा, ग्रामीण व शहरी समाजातील संगीताचे स्थान तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेल्या नव्या संधी आणि आव्हानांवरही त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे.

याशिवाय, संगीताचा मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम, ताणतणाव कमी करण्यातील त्याची प्रभावी भूमिका आणि दैनंदिन जीवनातील संगीताचे महत्त्व याविषयीही प्रा. दाढे यांनी या मुलाखतीत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/ स.सं

 

 


Join WhatsApp