Pune | Fri, 19 June 2026

No Ad Available

आषाढी वारीमध्ये वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा देऊन सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे – पालकमंत्री जयकुमार गोरे

Admin | 2 views
आषाढी वारीमध्ये वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा देऊन सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर दि. १९ (जिमाका):- आषाढी यात्रा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी भरणार असून, त्यानिमित्ताने आषाढी एकादशी पालखी सोहळा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा तसेच वारीमध्ये वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा तसेच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

आज रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा पालखी सोहळा नियोजनाचा आढावा प्रसंगी पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग पंढरपूर जी. एस. कथले, सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन साहेबराव देसाई, अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यातील अडथळे, रिंगण सोहळ्याचे ठिकाण, पालखी मुक्कामाची ठिकाणे, रस्ते व पूल दुरुस्ती अशी अन्य सर्व कामे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत. पालखी मार्गावर लावण्यात येणारे फिरते शौचालय तसेच कायमस्वरूपी शौचालय स्वच्छ ठेवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तात्पुरत्या शौचालयाजवळ चिखल राडाराडा होऊ नये, तसेच पालखी मुक्काम स्थळी योग्य त्या ठिकाणी काँक्रीटीकरण व मुरमीकरण दिलेल्या वेळेत पूर्ण करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

वारकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, निवाऱ्यासाठी जर्मन हँगर व वॉटरप्रूफ मंडप, फूट मसाज, आरोग्य सुविधा, मेडिसीन किट, स्नानगृहे, मोबाईल चार्जिंग व्हॅन, वारीतील वाहनांसाठी पुरेसे इंधन तसेच गॅस पुरवठा व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. सर्व विभागांनी हा पालखी सोहळा सर्वोत्तम म्हणून पार पाडण्यासाठी नियोजन करावे, निर्विघ्नपणे व आनंदी वातावरणात सोहळा पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, काही अडचणी निर्माण झाल्यास शासनास त्वरित कळवावे आणि ही जबाबदारी सेवाभाव समजून पूर्ण करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

वारीदरम्यान मोबाईलसाठी पुरेसे नेटवर्क मिळण्यासाठी अधिक टॉवरची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, निरीक्षण टॉवर, ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दल, तसेच नदी परिसरात लाइफ जॅकेट व बोटींग सुविधा देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. जर्मन हँगर उभारताना खाली जमिनीची लेव्हल एकसारखी असावी, पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या धरतीवर पालखी मार्गावरील व सर्व सुविधांमध्ये गुणवत्ता राखली जावी, तसेच वारीच्या काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये. यासाठी अत्यंत दक्ष राहून वारी यशस्वी करावी, अशा ही सूचना श्री. गोरे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शासन स्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. 65 एकर, वाळवंट परिसर आणि वाखरी या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक सुविधांचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली. ग्रामीण भागातून पालखी पुढे गेल्यानंतर व आधी स्वच्छता करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे पालखी मार्गावरील स्वागत कमानी, फिरते शौचालय 5000, पाण्याचे टँकर 220, तात्पुरते उपचार केंद्र 158, बाईक ॲम्बुलन्स 121, मेडिसिन किट 4500 हे दिंडी प्रमुखांना वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत पालखीतील मानाचे घोडे व बैल यांच्यासाठी चारा व निवारा याची सोय केली जाणार असून 23 ठिकाणी जर्मन हँगर असतील, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय पालखी विश्वस्त ॲङ राजेंद्र उमाप यांनी माऊलीच्या पालखीच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, तसेच मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, आणि वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी केली. संत तुकाराम पालखी विश्वस्त व सोपानकाका पालखी विश्वस्त यांनीही वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली.

0000

 

 

 


Join WhatsApp