Pune | Sat, 20 June 2026

No Ad Available

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ‘महाबीज’च्या आकृतीबंधास मंजुरी- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Admin | 1 views
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ‘महाबीज’च्या आकृतीबंधास मंजुरी- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि.16 : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे. हा आकृतीबंध अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र, कृषी विभागाने याबाबत आज शासन निर्णय जारी केला असून, एकूण 723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शासन निर्णयानुसार महाबीजच्या विद्यमान आकृतीबंधामध्ये सुधारणा करून 560 नियमित पदे, 100 अधिसंख्य पदे आणि 63 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास, प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम होण्यास तसेच बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना कृषी मंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.”

यापूर्वी, 30 ऑक्टोबर 2014 रोजी मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात एकूण 737 पदे होती. नव्या सुधारित आकृतीबंधात संस्थेच्या सध्याच्या गरजा, तांत्रिक बदल आणि कार्यपद्धतीतील सुधारणा लक्षात घेऊन पदरचनेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. अधिसंख्य पदे रिक्त झाल्यानंतर ती पुन्हा भरण्यात येणार नसून भविष्यात मंजूर नियमित पदांची संख्या 560 इतकीच राहणार आहे.

सुधारित आकृतीबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहरेकरी, लघुलेखक निम्न श्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे.

0000

श्रीमती संध्या गरवारे/विसंअ/


Join WhatsApp