
मुंबई, दि.16 :- राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत मिळतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य सेवांचा समीक्षा अहवाल, आरोग्य हेल्पलाईन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच सेवा गुणवत्तेचे नियमित रिव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे नागरिकांचा आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे श्री.फडणवीस यांनी नमूद केले.
बैठकीदरम्यान ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजना, पॉलिएटिव्ह केअर, सिकलसेल आजारावरील उपचार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढवणे, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित समावेशन जलद गतीने करणे याबाबत मागण्या मांडण्यात आल्या. याशिवाय आयुष संचालक, प्रशिक्षण संचालक आणि नर्सिंग क्षेत्रातील नवीन पदे निर्माण करण्याची आवश्यकताही उपस्थित अधिकाऱ्यांनी मांडली.
या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी, राज्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून दीर्घकालीन सुधारणा करण्यावर शासनाचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, समग्र संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल तसेच सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000
