Pune | Wed, 17 December 2025

No Ad Available

‘उमेद’च्या ग्रामीण महिलांचा देशाच्या राजधानीत झेंडा !

Admin | 1 views
‘उमेद’च्या ग्रामीण महिलांचा देशाच्या राजधानीत झेंडा !

नवी दिल्ली, 15 :  देशाच्या राजधानीत गेले तीन दिवस आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सव – 2025 च्या  निमित्ताने महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण खाद्य संस्कृतीचा खमंग दरवळ दिल्लीकरांना मोहित करुन गेला. केवळ खाद्यपदार्थांच्या सादरीकरणापुरता हा महोत्सव मर्यादित राहिला नाही, त्यासोबतच संस्कृतीच्या विविध आविष्कारांचे दर्शन झाले आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला राष्ट्रीय स्तरावरही व्यासपीठ मिळाले.  दिल्लीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवाचा नुकताच समारोप झाला.

कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले होते. तीन दिवस सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत दिल्लीच्या थंड हवेत महाराष्ट्राच्या मातीचे दरवळणारे खमंग सुगंध आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह लक्षणीय होता. महोत्सवात कोकणातील मालवणी सीफूड, कोल्हापूरचा तिखट तांबडा-पांढरा रस्सा, विदर्भातील झणझणीत सावजी मटण रस्सा, कोल्हापूरची मिसळ, खिमा पाव, खानदेशातील खापरावरची पुरणपोळी, वांग्याचे भरीत, गोळा भात, सांभार वडी, उकडीचे मोदक आणि शेव भाजी यांसारख्या पदार्थांनी मोठी गर्दी खेचली.

या उत्सवाचे खरे वैभव ठरले ते महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ‘उमेद’ योजनेअंतर्गत कार्यरत महिला स्वयंसहाय्यता गटांचा सहभाग. अमरावती, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, बीड आणि नागपूर येथील प्रशिक्षित महिलांनी आपले घरगुती आणि पारंपरिक पदार्थ राष्ट्रीय स्तरावर सादर करून ओळख मिळवली. यावेळी, महिलांनी निवासी आयुक्त आर. विमला यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ‘यामुळे आमच्या ग्रामीण स्वप्नांना पंख मिळाले’ अशी भावना व्यक्त केली.

समारोप समारंभात मार्गदर्शन करताना निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी आणि ‘उमेद’च्या महिलांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांचा उत्सव नव्हता, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संगम ठरला आहे. या यशात ‘उमेद’चा भक्कम पाठिंबा आणि निलेश सागर व त्यांच्या टीमचे मोठे योगदान आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या अधिकारी आणि संबंधित टीमने दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या यशस्वी आयोजनाच्या समारोपावेळी, निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते सर्व सहभागी महिला बचत गटांच्या सदस्यांचा खास भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोळपते, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह खासदार बळवंत वानखडे, अमर काळे, धैर्यशील मोहिते पाटील, प्रशांत पडोळे, नरेश मस्के, शिवाजीराव कालगे, भास्करराव  भगरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महोत्सवाला भेट देऊन प्रशंसा केली. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुविधांमुळे हा उत्सव कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरला.

0000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली


Join WhatsApp