Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला!

Admin | 8 views
विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला!

 

अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजल

मुंबई, दि. २८ : आमचे लाडके, कणखर, प्रेमळ आणि सदैव मार्गदर्शक असलेले अजितदादा आपल्यातून निघून गेले, हे वास्तव स्वीकारणं अशक्य वाटत आहे. ही बातमी ऐकताच डोळ्यांसमोर अंधार दाटून आला असून शब्द अपुरे पडले आहेत आणि अश्रूंनी डोळे भरून आले आहेत, अशी भावना अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली.

कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले, कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे आणि महाराष्ट्रातील जनतेचे अत्यंत लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी मनाला तीव्र वेदना देणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाला मुकला आहे. अजितदादांना महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, अशी शोकभावना त्यांनी व्यक्त केली.

आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे त्यांनी प्रशासनात वेगळा दरारा निर्माण केला होता. राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व म्हणून ते सर्वपरिचित होते. जनतेत रमणारा, जनतेसाठी झटणारा हा खरा लोकनेता होता.

दादा हे केवळ एक नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांच्या हृदयात धडधडणारे धैर्य होते. संघर्षात बळ देणारे, संकटात आधार देणारे आणि विकासाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे ते एक जिवंत प्रेरणास्थान होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी उमटवलेला ठसा कधीही पुसला जाणार नाही. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अक्षरशः कोलमडून गेले आहे.

आज महाराष्ट्राने एक निर्भीड, कणखर आणि जनतेसाठी अखंड झटणारे नेतृत्व गमावले आहे. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची लढवय्यी वृत्ती सदैव आम्हाला योग्य दिशा दाखवत राहील.

दादा… तुम्ही आमच्यातून गेलात, पण आमच्या हृदयातून कधीच जाणार नाहीत. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने दादांना कोटी-कोटी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पवार कुटुंबीयांच्या सोबत असून, हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो, अशा शब्दांत अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

 

००००

 

किरण वाघ/विसंअ


Join WhatsApp