Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले – वन मंत्री गणेश नाईक

Admin | 5 views
उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले – वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. २८ : आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकास्मिक निधनाची बातमी अतिशय वेदनादायक आहे. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दांत वन मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न हरपल्याची भावना  नाईक यांनी व्यक्त केली. नाईक यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, अजितदादांच्या कामाप्रति असलेल्या समर्पणाने राज्याच्या विकासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. स्पष्टवक्ते असले तरी कामाच्या दर्जाच्या बाबतीत ते गंभीर असायचे. कामातील हलगर्जीपणा त्यांनी कधीच मान्य केला नाही. प्रशासकीय कामावरील पकड व विकासाची दृष्टी असलेला जनतेचा नेता आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्याबरोबरच या अपघातात निधन झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ


Join WhatsApp