Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

Admin | 5 views
उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. 6  (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शनातून महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

डोंगरे वसतिगृह मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नाशिक यांच्या विद्यमाने आयोजित विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, अपर आयुक्त (महसूल) रवींद्र पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, हे प्रदर्शन जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी अधिक पाठबळ दिले आहे. महिलांसाठी उज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन, लखपती दीदी योजना यांसारख्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. कर्जाची नियमित परतफेड केल्यामुळे बचत गटांना व्यवसायासाठी बँका कर्ज उपलब्ध करून देत आहेत. स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांची उत्पादक क्षमता, व्यवस्थापन कौशल्य व उद्योजकीय दृष्टीकोन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्वयंसहाय्यता बचतगटांना उभारी देण्याचे काम अविरत केले जात आहे. या बचतगटांच्या उत्पादनांना जिल्हा व तालुकास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. अन्न पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात, परंतु बचतगटातील उत्पादनातून निर्भेळ खाद्यपदार्थ मिळण्याची शाश्वती असल्याने येणाऱ्या काळात या उत्पादनांना महत्त्व प्राप्त होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

या महोत्सवाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांकडून उत्पादित वस्तू व साहित्य विक्रीसाठी १४५ स्टॉल तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी ४० स्टॉल, अशा एकूण १८५ स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत एकूण ३१ हजार ७८५ महिला स्वयंसहाय्यता समूह कार्यरत असून, त्याद्वारे ३ लाख ०४ हजार ५८३ कुटुंब या अभियानाशी जोडली गेलेली आहेत. महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या आर्थिक बळकटीसाठी शासनाने फिरता निधी रुपये १५ हजार वरून रुपये ३० हजार इतका वाढविला आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत २६ हजार ४३७ समूहांना ३९ कोटी ६५ लाख रुपयांचा फिरता निधी वितरित करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

 एकल महिला उद्योजक व बँक सखी, पशू सखी यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार

  1.     प्रतिभा केदा निकम (एकल महिला), कौळाणे, ता.मालेगाव, जि.नाशिक
  2.     विजया एकनाथ सहाने (एकल महिला), हिवरे गाव, ता.सिन्नर, जि.नाशिक
  3.     अर्चना मनीष खराडे (एकल महिला), पारेगाव, ता.येवला, जि.नाशिक
  4.     धनश्री सतीश परदेशी (एकल महिला), कळवण तालुका, जि.नाशिक
  5.     स्वाती महेंद्र महानुभाव (बँक सखी), हिरापूर, ता.चांदवड, जि.नाशिक
  6.     सलमा आसिफ शेख (बँक सखी), पाटोदा, ता.येवला, जि.नाशिक
  7.     साधना नामदेव कांडळकर (बी सी सखी), खडकजांब, ता.चांदवड, जि.नाशिक
  8.     अनुसया रवींद्र काळे (पशू सखी), वाखारी गाव, ता.देवळा, जि. नाशिक

सिन्नर तालुक्यातील एकता प्रभाग संघ, नायगाव, हिरकणी महिला प्रभाग ठाणगाव, शिवनेरी महिला प्रभाग संघ, प्रगती महिला प्रभाग संघ, चास, राजमाता जिजाऊ प्रभाग संघ, नांदूर शिंगोटे यांना ग्रामीण विकास योजनेंतर्गत रोजगार वृद्धीकरिता पिकप वाहन वितरण करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांनी स्टॉल्सला भेट देत उत्पादनांची माहिती घेतली. प्रकल्प संचालक श्रीमती संगमनेरे यांनी आभार मानले.

000 

 


Join WhatsApp