Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Admin | 5 views
मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

मुंबई, दि. ४ : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष  आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत.

गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक २० तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे पण एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे  भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्‍ज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं.

दरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले.

००००


Join WhatsApp