Pune | Tue, 21 April 2026

No Ad Available

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली

Admin | 6 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २१ : वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘डॉ. गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या  संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या क्षेत्रातील नवनवीन संशोधन, ज्ञान तंत्रज्ञानाचा रुग्णांना लाभ व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. लातूरला शिवछत्रपती शिक्षण संस्था स्थापन करून, त्याअंतर्गत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या जोरावर देशभरात ओळख निर्माण केली. डॉ. पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभा सदस्यत्वाची संधी मिळाली. राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे या महत्त्वाच्या विषय समित्यांवर काम केले. डॉ. पाटील यांनी महाराष्ट्राच्या समाजकारण – राजकारणात निस्पृहपणे कार्य करण्याचा मानदंड निर्माण केला. त्या अर्थाने ते निरंतर सेवाव्रती होते.

डॉ. पाटील यांच्या निधनाने राज्याच्या वैद्यकीय सेवा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. पाटील कुटुंबीयांसह, त्यांच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000


Join WhatsApp