Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

मंजुरीनंतर १५ दिवसांत मिळणार मतदार ओळखपत्र – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

Admin | 7 views
मंजुरीनंतर १५ दिवसांत मिळणार मतदार ओळखपत्र – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नाशिक, दि. २५ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार नोंदणीला मंजुरी दिल्यानंतर १५ दिवसांत संबंधित मतदाराला मतदार ओळखपत्र मिळेल, असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिली.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय मतदार दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य निवडणूक अधिकारी सुनील सोनार, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, सहायक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दूल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, निवडणूक सदिच्छा दूत अभिनेता किरण भालेराव, मानवता किन्नर समाज संस्थेचे अध्यक्ष सलमा गुरू, व्याख्याते प्रा. तुषार पगारे, प्रा. गणेश रोडे, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या जिल्हा समन्वयक आसावरी देशपांडे, दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा आदी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी उपस्थितांना मतदार दिनानिमित्त शपथ दिली. ॉ

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग या दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेनंतर मतदार नोंदणी आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा अस्तित्वात आला. लोकशाही आणि विकास यांचा परस्पर संबंध आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकशाही बळकट असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करावे. भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नि:ष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. त्यातूनच आचारसंहिता, छायाचित्र मतदार यादी, इव्हीएम, निवडणूक निरीक्षक, मतमोजणी प्रक्रिया या संकल्पना पुढे आल्या. इव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा पुरविण्यात येते. अपात्र मतदार यादीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. मतदार यादीतील समान छायाचित्रे असलेले मतदार शोधण्याचे काम सुरू आहे. मतदार यादी त्रुटी विरहीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या अडचणीची आपल्याला जाणीव आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, भारतीय निवडणूक व्यवस्था अतिशय जवळून बघितली आहे. एवढेच नव्हे, तर या प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहभाग घेतला आहे. आपली निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडली जाते. या प्रक्रियेतील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून ते निवडणूक निर्णय अधिकारी अतिशय शिस्तीत काम करतात. निवडणूक यंत्रणेचे काम कौतुकास्पद आहे. लोकशाही टिकवून ठेवण्यात आपली भूमिका महत्वाची आहे. याबरोबरच जिल्हा प्रशासनाचा समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे. नागरिकांनी निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

उपमुख्य निवडणूक अधिकारी श्री. सोनार म्हणाले की, आजच्याच दिवशी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी प्रा. पगारे, प्रा. रोडे यांनी ‘भारतीय संविधान’ याविषयावर मार्गदर्शन केले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अनिल माने, श्रीमती सोनाली, श्रीमती देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती पेटकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीला भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा संदेश दाखविण्यात आला. यावेळी मतदार विषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शांतारामबापू वावरे महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. यावेळी मतदान नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

यावेळी  मान्यवरांच्या हस्ते निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी सीमा अहिरे (नांदगाव), शुभांगी भारदे (नाशिक पश्चिम), नितीन सदगीर (मालेगाव मध्य), बाबासाहेब गाढवे (येवला), तहसीलदार रोहिदास वारुळे (कळवण), आबा महाजन (येवला), मुकेश कांबळे (दिंडोरी), श्री. वाकचौरे, मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक अतिक अहमद अब्दुल कयूम, महेंद्र दिघावकर, रवींद्र बच्छाव, संजय गाडे, मधुकर गवांदे, वरदा सोमण, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अविनाश पवार, नीलेश निरभवणे, गणेश कदम, वृषाली नागोरे, शांताराम गांगोडे, सोमनाथ माळोदे, हेमंत निकम, प्रणय तेजाळे, राहुल काळे, श्रीमती पी. एस. जाधव, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कैलास कुऱ्हाडे, इफ्तेकार हुसेन, प्रशांत वाघ, प्रतीक्षा ह्याळीज, भागवत चौधरी, दीपक निकम, अंकुश भवर, अनिल उगले, योगेश गवळी, ज्ञानेश्वर पाचोरे, भगवान पगारे, केशव ठोंबरे, संगीता शेलार, वैशाली पाटील, संजय दोबाडे आदींचा सत्कार करण्यात आला.

०००००


Join WhatsApp