Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

महाराष्ट्रातील ‘पद्म पुरस्कार’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Admin | 8 views
महाराष्ट्रातील ‘पद्म पुरस्कार’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. २५ :- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा समावेश झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय सेवा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या मान्यवरांचा गौरव राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असून महाराष्ट्रातील मान्यवरांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही पावती आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा देशपातळीवर अधिक उंचावली आहे.

महाराष्ट्रातील पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिवंगत धर्मेंद्र सिंह देओल (कला), पद्म भूषण पुरस्कारप्राप्त श्रीमती अलका याज्ञिक (कला), दिवंगत पियुष पांडे (कला), श्री. उदय कोटक (व्यापार व उद्योग) तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. आर्मिडा फर्नांडिस (वैद्यकीय सेवा), श्री. अशोक खाडे (व्यापार व उद्योग), श्री. भिकल्या लाडक्या धिंडा (कला), श्री. जनार्दन बापूराव बोथे (समाजसेवा), श्री. जुझेर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी), श्री. माधवन रंगनाथन (कला), श्री. रघुवीर तुकाराम खेडकर (कला), श्री. रोहित शर्मा (क्रीडा), दिवंगत सतीश शाह (कला), श्री सत्यनारायण नुवाल (व्यापार व उद्योग) व श्री श्रीरंग देवाबा लाड (कृषी क्षेत्र) यांचा समावेश आहे.

यामध्ये धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण, पियुष पांडे यांना कला क्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मभूषण तर सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, या मान्यवरांच्या कार्यकर्तुत्वाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करत तसेच इतर सर्व पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००


Join WhatsApp