
बुलढाणा, दि. ८: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरण मोहिमेला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत आज मेहकर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचे लोकार्पण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवाशांना सुरक्षित, आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकार्पण समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, सिद्धार्थ खरात, मेहकर नगरपालिका अध्यक्ष किशोर गारोडी, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ, कार्यकारी अभियंता राहुल मोडक, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, मेहकर हे विदर्भातील एक महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि धार्मिक केंद्र असून दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन हे नवीन बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
सन २०१९ मध्ये या प्रकल्पाला ३ कोटी ९ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. विविध तांत्रिक अडचणी आणि कोविडसारख्या अभूतपूर्व संकटांवर मात करत हा प्रकल्प आज पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन बसस्थानकात सहा व्यावसायिक गाळे, चालक-वाहक विश्रांतीगृह, महिला व पुरुष प्रवासी विश्रांतीगृह, अधिकारी विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प व स्वच्छतागृह, आधुनिक प्रसाधनगृहे, उपाहारगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस चौकी आणि पार्सल कक्ष अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रीटीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी २२ लाख रुपयांच्या कामाचीही यशस्वी पूर्तता झाली असून बचत झालेल्या निधीतून मेहकर आगार परिसरातील अतिरिक्त काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे बसस्थानक परिसर अधिक सुबक, स्वच्छ आणि टिकाऊ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरनाईक यांनी राज्यभर सुरू असलेल्या एसटीच्या आधुनिकीकरण मोहिमेची माहिती देताना सांगितले की, केवळ नवीन इमारती उभारणे हा उद्देश नसून प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासन आणि एसटी महामंडळाचे ध्येय आहे.
राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहेत. बसस्थानके, बसेस, परिसर आणि चालक-वाहक विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता राखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे.
३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार
येथील सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार मेहकर आगारालाही लवकरच नवीन ३० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली.
राज्यभर ई-बस सेवा विस्तारण्याचा महामंडळाचा निर्धार
“वर्ष २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न पूर्ण झाल्यास देशातील संपूर्णपणे इलेक्ट्रिक बससेवा देणारे पहिले राज्य परिवहन महामंडळ म्हणून महाराष्ट्र एसटीची ओळख निर्माण होईल,” असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यभर एसटी डेपो, बसस्थानके आणि कार्यशाळांमध्ये चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या बसेस चार्ज करण्याबरोबरच या सुविधा इतर इलेक्ट्रिक वाहनांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करताना सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावरही महामंडळ भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. काही डेपोच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले असून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध आहे, तेथे ‘सौर शेती’ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून इंधन व वीज खर्चात बचत होण्याबरोबरच अतिरिक्त वीज विक्रीतून महसूलही मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाला अनुसरून एसटी महामंडळ ठोस पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेहकरच्या नागरिकांनी नवीन बसस्थानकाची स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभाल यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करताना सरनाईक म्हणाले, “ही वास्तू केवळ एसटी महामंडळाची नसून मेहकरकरांची सामूहिक संपत्ती आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणारे अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन करत, “प्रवाशांची सेवा हेच आमचे ध्येय आणि आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ एसटी हीच आमची वचनबद्धता आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर डेपोचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, चार तालुक्यांतील प्रवासी या डेपोवर अवलंबून असल्याने येथे बससेवेची मोठी गरज आहे. नव्या बसस्थानकामुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. एसटी महामंडळ हे सुरक्षित व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक साधन असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विविध सवलतीच्या योजना राबविल्या जात असून त्याचा लाभ प्रवासी घेत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटी सेवेचा वापर करत असल्याने त्यांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नव्या बसस्थानकामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती देण्यात आली.
००००
