Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 23 views
माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : माधव अगस्ती यांनी आपल्या वेशभूषा क्षेत्रातील ५० वर्षांच्या कारकीर्दीत विविध नेते आणि अभिनेत्यांना वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा  दिली. त्यांच्या वेशभूषेने प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेला स्वतंत्र ओळख मिळाली असून अतिशय मेहनतीने या क्षेत्रात नाव कमावलेल्या अगस्ती यांचा जीवनप्रवास  प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रसिद्ध वेशभूषाकार अगस्ती यांच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या ‘स्टिचिंग स्टारडम : फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते बोनी कपूर, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्यासह चित्रपट आणि फॅशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माधव अगस्ती यांनी भारतातील विविध शहरात काम केले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात त्यांनी स्टायलिस्ट बनण्याचा घेतलेला निर्णय धाडसी होता, तथापि, अतिशय मेहनतीने काम करून त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. यामुळेच आज देशातील मोजक्या स्टायलिस्टमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राच्या बहुतांश मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी पोशाख डिझाईन केल्याची माहिती घेऊन मी स्वतः शपथविधीच्या वेळी माधव अगस्ती यांनी शिवलेले जॅकेट घातल्याची आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, चित्रपट निर्माते बोनी कपूर, अभिनेता अक्षय कुमार, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनीही यावेळी माधव अगस्ती यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अगस्ती यांनीह यावेळी मनोगत व्यक्त करताना नागपूर ही माझी जन्मभूमी तर मुंबई ही माझी कर्मभूमी असल्याचे सांगितले. पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी आपल्याला सहकार्य केल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

०००


Join WhatsApp