Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे; गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

Admin | 12 views
कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे; गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. ३१ जानेवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे जागेची मर्यादा असल्याचे मंत्री महाजन यांनी नमूद केले. नाशिकमधील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर येथील जागा मर्यादित असून, त्या तुलनेत भाविकांची संख्या चार ते पाच पटीने वाढणार आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनासह पायाभूत सुविधांचे सखोल व शिस्तबद्ध नियोजन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. देशभरातून तसेच जगभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी येणार असल्याने, त्यांनी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अत्यंत सुरेख, नियोजनबद्ध आणि सुयोग्यरीत्या पार पडल्याची भावना व्यक्त करावी, या दृष्टिकोनातून सर्व यंत्रणांनी आणि प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने कामे पार पाडावीत, असेही मंत्री महाजन म्हणाले.
रस्ते, काँक्रीटीकरण, गोदावरी स्वच्छता तसेच मलनिस्सारण प्रकल्पांच्या कामांमुळे नागरिकांना काही प्रमाणात तात्पुरती गैरसोय होऊ शकते; मात्र ही सर्व कामे गुणवत्तेची कोणतीही तडजोड न करता दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामे करताना कोणतीही चूक होणार नाही, यासाठी कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी. कामांमध्ये त्रुटी आढळल्यास शासन जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा ही यासाठी दिशादर्शक व मोलाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेत बोलताना विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी गुणवत्ता नियंत्रण हे नियोजन आणि अंमलबजावणीचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महाआयोजनासाठी तांत्रिक मानकांचे काटेकोर पालन, सातत्यपूर्ण देखरेख तसेच सर्व यंत्रणांमधील समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिकमधील पावसाळ्याचा विचार करूनच कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पावसाळ्याची कालावधी व तीव्रता कामांच्या गुणवत्तेवर परिणाम करणार नाही, यासाठी अभियांत्रिकी नियोजन, साहित्य निवड व अंमलबजावणीचे वेळापत्रक हवामानाशी सुसंगत असावे, असे त्यांनी सांगितले. गुणवत्ता तपासणी, देखरेख तसेच तृतीय-पक्ष गुणवत्ता हमी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेत आयआयटी मुंबईचे डॉ. धर्मवीर सिंह यांनी बिटुमिनस तसेच काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामातील महत्त्वाच्या तांत्रिक बाबी, लवचिक व कठीण रस्त्यांचे निकष यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विकास ठाकर यांनी नागरी पायाभूत सुविधा समन्वय, पावसाळी पाणी व्यवस्थापन, कामांची गुणवत्ता व नियंत्रण याविषयी माहिती दिली. तृतीय-पक्ष गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे अविनाश आठवले व वैभव भोसले यांनी आयएसओ १७०२०:२०१२ मानकांनुसार तपासणी, निरीक्षण व अहवाल प्रक्रियेचे सादरीकरण केले. देवलाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पियुष पाटील यांनी विविध परवानग्या व ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अंमलबजावणी यंत्रणांचे अभियंते तसेच गुणवत्ता नियंत्रण व तृतीय-पक्ष तपासणी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००


Join WhatsApp