Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक

Admin | 27 views
करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई, दि. 11 :- करमाळा तालुक्यात सिंचनासाठी जलनियोजनानुसार पाणी उपलब्ध होण्यासाठी कुकडी कालवा दुरुस्ती करणे व जलबोगद्याद्वारे माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी सोडणे गरजेचे असल्याने या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात रिठेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थित होत.

यावेळी आमदार नारायण आबा पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ संजय बेलसरे, सहसचिव अलका आहेरराव, मुख्य अभियंता चोपडे, तसेच लाभ क्षेत्रातील संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, कुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती करून पाणी उपलब्धता वाढवता येईल. यामुळे पाणी गळती देखील कमी होईल. माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी आणण्यासाठी जलबोगदा करण्याबाबत योजना, पाणी कुकडी कालव्याद्वारे करमाळ्यास आणून येथील बंधारे व धरणामध्ये साठवणे या दृष्टीने उपाययोजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धता कमी असून जल नियोजनानुसार 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी यादृष्टीने विभागाने काम करावे. उजनी धरणातील पाणी वाटप नियोजन यापूर्वीच निश्चित झालेले असून त्याऐवजी डिंभे धरणातून माणिकडोह मध्ये पाणी उपलब्ध करून देता येईल, यासह इतर पर्याय तपासून तातडीने कार्यवाही करावी. या दृष्टीने सर्वेक्षण करून अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात यावा, 45 दिवसात कार्यवाही केली जावी.

बैठकीमध्ये आमदार आबा पाटील आणि सरपंच अंकुश शिंदे, मदन पाटील, रश्मी बागल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या भागास सिंचनासाठी पाणी मिळावे या दृष्टीने विभागाच्या वतीने तयार केलेल्या नियोजनावर तसेच वॉपकॉस संस्थेचा अहवाल याबाबतही बैठकीत चर्चा झाली. करमाळा तालुक्यातील 23 हजार 704 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.

0000

किरण वाघ/विसंअ


Join WhatsApp