Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Admin | 19 views
केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २०: पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी २२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ घेण्यात आली होती. ही ऑनलाईन परीक्षा ३ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन सत्रात पार पडली. परीक्षेसाठी एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते, त्यापैकी ३८५५९ परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते.

परिषदेकडून हा निकाल १३ मार्च २०२६ रोजी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in  वर जाहीर करण्यात आला. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाटीईटी अथवा सीटीईटी ही सर्वांत पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती पूर्वी १६ मार्च ते २१ मार्च २०२६ या कालावधीत https://mscepune.in/dtedola/KP२०२६Info.aspx  या लिंकवर भरायची होती. मात्र, उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती २२ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भरण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.

०००


Join WhatsApp