
छत्रपती संभाजीनगर, दि. २४: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक जनजागृती, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचा सहभाग तसेच प्रशासनातील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक असून, कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या आढावा व मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागातील जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी तसेच निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबविण्यात यावी. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी कायदा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयांचा अभ्यास करून कायदेशीर तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात यावी. कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, तसेच अपात्र नोंदींची काटेकोर छाननी करूनच आवश्यक निर्णय घेण्यात यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रनिहाय उद्दिष्टे निश्चित करून मतदार यादी मॅपिंगच्या कामाला गती देणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण कार्यक्रम, पडताळणी प्रक्रिया तसेच अर्ज व्यवस्थापन यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करणार आहेत. यावेळी मतदारांची माहिती, नाव, पत्ता, छायाचित्र तसेच या माहितीतील विसंगती आणि इतर तपशीलांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा डुप्लिकेट नोंदींची तपासणी करून मतदार यादी अधिक अचूक करण्यावर भर देण्यात येणार आहे. ही संपूर्ण अचूक माहिती डिजीटल पध्दतीने अपडेट करण्याचे काम वेळेत झाल्याचीही संबंधितांनी खात्री करून घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
श्री. चोक्कलिंगम यांनी विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यासंदर्भातील संबंधित अधिकारी यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करत त्यांना मार्गदशन केले तसेच त्यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेत विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील तयारीची माहिती सादर केली. प्रशिक्षण, जनजागृती, मॅपिंग, बीएलओ नियुक्ती, अर्ज वितरण व पडताळणी प्रक्रिया यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, हिंगोली जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
