
नागपूर, दि. १४: आज ज्यांना राजरत्न पुरस्कारांनी गौरविण्यात आले, त्यांचे देदीप्यमान कार्य पाहिल्यानंतर आपले भविष्य उज्वल आहे असा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त आयोजित राजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट तर्फे सिनियर भोसला पॅलेस येथे आज सायंकाळी हा सोहळा पार पडला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) त्र्यंबकेश्वर येथील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे होते. यावेळी मध्यप्रदेशच्या आरोग्य मंत्री संपतीया उईके, श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम), श्रीमंत राजे मुधोजी भोसले, माजी महापौर दयाशंकर तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

विजय साळवी, मुंबई (पत्रकारिता), प्रा. विजया मारोतकर (साहित्य), सागर कांबळे, पुणे (क्रीडा), डॉ. संगीता राऊत (संगीत), विनय शुक्ला (छायाचित्रकार), संदीप शिंदे, यवतमाळ (वैशिष्ट्यपूर्ण कार्य), मधुरा मेहर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य), क्रिया सोनी (क्रीडा) यांचा यावेळी राजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर शांकरी किशोरराव जाधवला विशेष प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांनी अटक ते कटक असा हिंदवी स्वराज्याचा विस्तार केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओरिसा, बंगाल अशा अनेक राज्यांमध्ये नागपूरकर भोसले यांनी पराक्रम गाजवून सुराज्य निर्माण केले. गोंड राजांनी नागपूरला शहराचे रूप दिले आणि भोसले राजांनी नागपूरला सुनियोजित शहर म्हणून विकसित केले. राजे रघुजींची तलवार महाराष्ट्र सरकारने भारतात आणली आणि लवकरच ती नागपूरला आणली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी प्रस्ताविक केले. सारंग ढोक यांनी सूत्रसंचालन केले.
०००
