Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

गडचिरोलीची वाटचाल माओवाद समाप्तीकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 12 views
गडचिरोलीची वाटचाल माओवाद समाप्तीकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर

गडचिरोली दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल म्होरक्यांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले आहे. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद पूर्णपणे हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत असून महाराष्ट्रासाठी हे अभिमानस्पद असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिकचे बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह  एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय रिझर्व पोलीस दल उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात उपस्थित होते.

ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून माओवाद पसरवणाऱ्या भूपतीसारख्या माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. “ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे. आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिला गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे, आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.

समता केवळ संविधानातूनच

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दंडकारण्याच्या या भागातील लोकांनी माओवादाशी लढा दिला. माओवादामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला. ‘पिपल्स वॉर ग्रुप’ द्वारे माओवादी सक्रिय झाले आणि त्यांनी येथील युवकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध संभ्रम निर्माण केला. मात्र समता व न्याय फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी चळवळीच्या नादी लागलेले आता आत्मसर्पण करत आहेत.

 आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आत्मसमर्पण करणाऱ्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ, आत्मसमर्पण केलेल्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येईल. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना येथील उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असून, भविष्यातही रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात येईल. सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी १ लाख ५५ हजार रुपये देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारची रणनीती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माओवादाविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या धोरणांचे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत माओवाद संपवण्यासाठी आखलेल्या रणनीतीचे कौतुक केले. या धोरणात आत्मसमर्पणातून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलीस कारवाईला सामोरे जाणे हे दोनच पर्याय असल्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात माओवादाचे उच्चाटन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन आणि पुरस्कार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलिसांनी सातत्याने माओवादविरूद्ध मोहिमा आखून माओवादाला जेरबंद व नेस्तनाबूत केले. विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नवीन माओवाद्यांची भरती रोखली, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन करत गडचिरोली पोलीस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. तसेच सजग राहण्याचे आणि लोकांचा यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

विकास आणि रोजगार

गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा ‘स्टील मॅग्नेट’ बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना ९० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात असून, १ लाख स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीत पायाभूत सुविधा उभारताना जल, जमीन, जंगल यांचा विनाश होऊ नये यासाठी ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचे ग्रीन स्टील हब तयार करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0000


Join WhatsApp