
नागपूर, दि. १९ :- मातृसेवा संघ शताब्दी महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचे आरोग्य केंद्र म्हणून असलेली ओळख अत्यंत परिश्रमाने जपली आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त मातृसेवासंघातर्फे जनसेवेच्या सर्व प्रकल्पांना तसेच नूतन महिला वसतिगृहाच्या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
सीताबर्डी परिसरातील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात संस्थेचा १०५ वा वर्धापन दिन सोहळा तसेच स्मृतिफलकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अरुणा बाभूळकर, सचिव डॉ.लता देशमुख, उपाध्यक्ष रश्मी भावे आदी उपस्थित होते.

पद्मश्री कमलाताई होस्पेट व वेणुताई नेने यांनी स्वातंत्र्यापूर्वी मातृसेवासंघाची स्थापना केली. याकाळात केवळ डफरीन येथे इंग्रज कुटुंबांच्या महिलांसाठीच प्रसुतीची व्यवस्था होती. सामान्य भगिनींनाही प्रसुतीची व्यवस्था व्हावी यासाठी मातृसेवा संघाच्या माध्यमातुन अशा सुविधा निर्माण करतांना गरिब रुग्णांसाठी निशुल्क सेवा दिली. या संस्थेच्या माध्यमातून सेवा भाव करतांनाच सेस्थेचे व्यावसायिकरण होऊ दिले नाही आणि आजही सेवा भाव जपला जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या आरोग्यासोबतच बाल आरोग्य व बालमृत्यू थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच सूतिकागृहाच्या माध्यमातून सामान्य माणूस संस्थेसोबत आजही जुळला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शतक महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसोबतच महिला वसतिगृहाच्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. संकल्प चित्रानुसार इमारतीच्या बांधकामामध्ये जी मदत करता येईल ती निश्चितपणे करण्यात येईल. सुरक्षित मातृत्वासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ व सुरक्षित मातृत्वाचा संकल्प केला आहे. त्यानुसारच मातृसेवा संघांची वाटचाल सुरु असल्याचे सांगतांना श्री.फडणवीस म्हणाले की, याक्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थाचा चांगलाच सहभाग आहे. अशा संस्था आदिवासी व अतिदुर्गम भागातही कुपोषणासह महिला व बालकांच्या आरोग्य सेवेमध्ये चांगले काम करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

शतक महोत्सवी अभिनव वृक्षारोपण
शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमासोबतच वृक्षारोपण मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहीमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर अभिनव पद्धतीने लिंबांचे वृक्ष लावून करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी एका कुंडीत वृक्ष लावून शतक महोत्सवी वृक्ष म्हणून संवर्धन व संगोपण करण्याची जबाबदारी मातृसेवा संघाने स्वीकारावी अशी सूचना यावेळी केली.
महापौर निता ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अक्षध्या डॉ.अरुणा बाभूळकर यांनी स्वागत केले तर सचिव श्रीमती लता देशमुख यांनी प्रास्ताविकात मातृसेवा संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार व कार्यक्रमांचे संचलन जयश्री वाघ यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षीका डॉ.पुष्पा भावे तसेच संस्थेचे पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
