Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

Admin | 11 views
दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

नवी दिल्ली दि.2-: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी, मराठी अधिकारी आणि माध्यमकर्मीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

जुन्या महाराष्ट्र सदन येथे आयोजित शोकसभेला खासदार रविंद्र वायकर, निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, माहिती संचालक हेमराज बागुल आणि प्रफुल्ल पाठक, केंद्रीय पोलीस अधिकारी डॉ.धनंजय घनवट, सायबर अधिकारी विनायक गोडसे, सहायक निवासी आयुक्त, नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खासदार रविंद्र वायकर यांनी अजित दादा म्हणजे राजकारणातील ‘दादा’ माणूस होते. असे सांगून विधानसभेतील त्यांचा वावर, कामाची शिस्त, हजरजबाबीपणा आणि प्रशासनावरील पकड याबाबत माहिती दिली. तसेच  त्यांनी आपल्या मैत्रीच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

निवासी आयुक्त आर. विमला यांनी प्रशासनात काम करताना त्यांच्या वक्तशीरपणाचा आणि लोकहिताच्या कामाला प्राधान्य देण्याच्या वृत्तीचा आम्हाला नेहमीच अनुभव आला. चांगल्या कामासाठी ते सदैव पाठीशी उभे राहत, असे नमूद केले.

माहिती संचालक हेमराज बागुल यांनी अजित दादांच्या निधनाने संपूर्ण  महाराष्ट्र हळहळला. स्पष्ट भूमिका आणि रोखठोक स्वभाव ही त्यांची ओळख होती. पदापेक्षा त्यांचे कार्य आणि जपलेले माणुसपण खूप मोठे होते, असे गौरवोद्गार काढले.

प्रफुल पाठक यांनीही अजित दादांसोबतच्या कामाचे अनुभव सांगत त्यांच्यातील संवेदनशील माणूस अधोरेखित केला.

आसाम येथील पोलीस अधिकारी डॉ धनंजय घनवट यांनी दादांनी केलेला बारामतीचा विकास हे विकासाचे उत्कृष्ट मॉडेल असल्याचे सांगितले. बारामतीच्या भूमीपुत्राने आपल्या कार्यप्रणालीने देशात आपला नाव लौकिक वाढवावा. बारामतीचे नाव मोठे करावे असा सल्ला दिला असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाने राज्याचे खुप नुकसान झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले.

विनायक गोडसे यांनी तंत्रज्ञान, सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर अजित दादा यांच्याशी झालेल्या वेग वेगळ्या चर्चा यांचा संदर्भ देत आठवणीना उजाळा दिला.

यावेळी सदनातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली.

 

0000000


Join WhatsApp