
धुळे, दि. २६ (जिमाका) : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसमोर ठेवले आहे. हे ध्येय साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर आणि बलशाली धुळे जिल्हा घडविण्याचा संकल्प करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव खेडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह स्वातंत्रसैनिक, आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, खेळाडू, विद्यार्थी, माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, धुळे जिल्ह्यात नरडाणा येथे औद्योगिक वसाहत तसेच शिरपूर, दोंडाईचा येथे विविध उद्योग, व्यवसाय कार्यरत आहेत. साक्री येथे सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे. आपल्या जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात अक्कलपाडा, सुलवाडे, अमरावती, सोनवदसह विविध धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा आहे. कुशल मनुष्यबळ आहे. या जिल्ह्यातून सहा राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळे व शिरपूर येथे विमानतळ आहे. तसेच ऐतिहासिक किल्ले व पर्यटनस्थळे ही धुळे जिल्ह्याची बलस्थाने आहेत. या सर्व घटकांच्या बळावर जिल्ह्याची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.

सुलवाडे–जामफळ उपसा सिंचन योजना ठरणार गेमचेंजर
तापी नदीवरील सुलवाडे – जामफळ उपसा सिंचन योजना आकार घेत आहे. ही योजना आपल्या जिल्ह्याचा चेहरा- मोहरा बदलणारी ठरणार आहे. या प्रकल्पावर पाच हजार ३२९ कोटी रुपये खर्च होणार आहे. बोरविहीर ते नरडाणा दरम्यान लोहमार्ग टाकण्यास सुरूवात झाली आहे. बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी धुळे तालुक्यातील बोरविहीर ते सोनगीर या ३९ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. तसेच मनमाड – इंदूर रेल्वे मार्गसाठी शिंदखेडा तालुक्यातील आठ व शिरपूर तालुक्यातील १४ गावांमधून जाणार असून त्याचेही भूसंपादन प्रगतीपथावर आहे. या सर्व बाबी असताना आता आपण थांबायचं नाही, तर विकासाकडे वाटचाल करायची आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून विकासाला चालना
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे साध्य केली जात आहेत. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेत एकूण ५३३ कोटी ८१ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. या योजनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आदी विकास कामांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे.

शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय
जिल्ह्यात रब्बी हंगामात आतापर्यंत १ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला असून रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे, खत पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानापोटी शासनाकडून जिल्ह्यासाठी ९४ कोटी अनुदान प्राप्त झाले असून त्याचे वितरण सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ शेतकाऱ्यांना दिला जात आहे. पीएम किसान योजनेत १ लाख ५३ हजार ३७५ शेतकऱ्यांना २१ हप्ते, तर राज्य शासनाच्या नमो किसान सन्मान योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात नाफेडमार्फत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये १२ हजार ६१५ क्विंटल मका, तीन हजार ५६० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. याबरोबरच १ हजार ९२१ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. भारतीय कापूस महामंडळामार्फत पूर्वी आपल्या जिल्ह्यामधील कापूस १० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमतेनुसार खरेदी होत होती. ती मर्यादा प्रति हेक्टरी २३ क्विंटल करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात २३७ कोटी १९ लक्ष रुपयांची ३ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
आरोग्य व सामाजिक उपक्रम
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय कक्षामार्फत गंभीर आजारांच्या ५२ रुग्णांना उपचारासाठी ४१ लाख १५ हजार रक्कम देण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकाच दिवशी ४ हजार ३१३ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. नमोनेत्र अभियानात १७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या अभियानात २ हजार रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली असून ५ हजार ५०० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे. धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ गरजू रुग्णांनी घेतला पाहिजे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामग्री, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील ११२ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतींने देशात नावलौकिक मिळविला. या ग्रामपंचायतीने देशात ई-गव्हर्नन्समध्ये दहा लाख रुपयांचे प्रथम बक्षीस आणि सुवर्ण पदक पटकावले. या ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतीने घ्यावा. धरती आबा अभियान अनुसूचित जमाती बहुल २१३ गावांत राबविण्यात येत आहे. या अभियानात धुळे जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात १ हजार ९७९ शाळांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थिंनींना संकट समयी स्वसंरक्षण करता यावे म्हणून जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थिंनीना विरांगना प्रशिक्षण देण्यात आले.
अनुकंपा भरतीला गती
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली अनुकंपा भरती प्रक्रिया सरकारने पूर्ण केली. मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत गट ‘क’ संवर्गात ६८, गट ‘ड’ संवर्गात ३४, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘क’ सेवा परीक्षेतील ४९ उमेदवारांना अशा विविध संवर्गात एकूण १५१ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असून राज्य शासनाचे ‘सबका साथ – सबका विकास’ धोरण निश्चितच यशस्वी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
यांचा झाला सन्मान
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने ध्वज निधी संकल्प योजनेअंतर्गत उत्कृष्ट ध्वज निधी संकलन करुन १०१ टक्के इष्टांक साध्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.
धुळे जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रधानमंत्री सुक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत तालुका कृषि अधिकारी, धुळे कार्यालयातील श्रीमती माधुरी रमेश गायकवाड, शाखा प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, आर्वी येथील श्री. के. वि. नरसिंहाराव व जिल्हा संसाधन व्यक्ती श्रीमती सीमा मच्छिंद्र पवार यांना स्थानिक पातळीवर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारातंर्गत मुख्याध्यापक के. डॉ. अस्मिताताई प्रतापराव दिघावकर विद्यालय देऊर (बु.) ता. जि. धुळे येथील श्री. कल्याणराव अर्जुन देवरे, उपशिक्षक, जि. प शाळा वासखेडी (ता. साक्री जि. धुळे) येथील श्री. रामचंद्र सुकदेव भलकारे, उपशिक्षक, जि. प. शाळा वारगांव केंद्र बेटावद (ता. शिंदखेडा जि. धुळे) येथील श्रीमती संगिता भास्कर मराठे, उपशिक्षक, जि. प. शाळा अंचाळे (ता. धुळे) येथील श्रीमती अरुणा नामदेव पवार यांना प्रदान करण्यात आला आहे.
संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाने निवड झाल्याने माईसाहेब लक्ष्मीबाई गोरखनाथ महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी (ता. शिरपूर जि. धुळे) येथील मोहित मनोज चारण तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा भाडणे (ता. साक्री जि. धुळे) येथील प्रिया मधुकर गांगुर्डे यांना संविधान दिनानिमित्त राज्यातून द्वितीय क्रमांकाने निवड झाल्याने पुरस्कार प्रदान करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग, धुळे यांच्याकडून श्रीकृष्ण गोशाळा खर्दे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील श्री. मनोज रामराव सोनवणे यांना शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी दिवसानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारीत जिल्हास्तरीय हिंद-दी-चादर या विषयावरील चित्रकला, वकृत्व स्पर्धा, निबंध व गायन स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थींनी नेहा बंजारा जि. प. शाळा निकुंभे (ता. धुळे) हिला चित्रकला स्पर्धा, जि. प. शाळा सैताळे येथील साक्षी बारकु वाघ, निंबध स्पर्धा, तर जि. प. शाळा कुळथे येथील दिपाली देविदास चव्हाण यांना वक्तृत्व स्पर्धासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शासकीय विद्यानिकेतन, धुळे येथील राजकुमार जलसिंग तडवी यांना चित्रकला स्पर्धेसाठी, अभय माध्यमिक शाळा धुळे, येथील महिमा कृष्णकुमार शिंदे यांना वक्तृत्व स्पर्धासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल, धुळे येथील सवी कलशा पाडवी यांना निबंध स्पर्धेसाठी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६, धुळे, धुळे जिल्हा आरसीपी क्यूआरटी पथक, जिल्हा पोलीस दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड (पुरुष व महिला), छत्रपती शिवाजी महाराज सैनिक विद्यालय, मोराणे, किसनराव सोनूजी करणकाळ न्यू सिटी हायस्कुल धुळे एसएससी पथक, शासकीय विद्यानिकेतन, धुळे एसएससी पथक, सेंट ऍथनी कॉन्व्हेट हायस्कुल, महिला एनसीसी पथक, कनोसा कॉन्व्हेट हायस्कुल, श्री. एकवीरा देवी माध्यमिक कन्या विद्यालय, जो. रा. सिटी हायस्कुल, किसनराव सोनुजी करणकाळ न्यु सिटी हायस्कुल, धुळे स्काऊट पथक, विद्यावर्धिनी महाविद्यालय एनसीसी पथक, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा भांडणे तसेच धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्त बँड पथक, श्वान पथक (सॅम) चलचित्र वाहन, मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, फिंगर प्रिंट वाहन, वरुन वाटर कॅनॉन, १०७ रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक आदींनी संचलनात सहभाग घेतला.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. श्री. एकविरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे, आबेदा अब्दुल मुगनी उर्दु गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, धुळे, कनोसा कॉन्व्हेट हायस्कुल, धुळे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. एस. व्ही. के. एम हायस्कुल, धुळे यांनी समुह नृत्य तर पिंपळादेवी हायस्कुल मोहाडी यांनी भारतीय लेझीम नृत्य सादर केले. यावेळी बाल विवाह न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धुळे आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
