Pune | Sat, 27 June 2026

No Ad Available

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा

Admin | 1 views
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा

रायगड-अलिबाग, दि. २७ (जिमाका) : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५३ वा राज्याभिषेक दिन सोहळा आज दुर्गराज रायगडावर पारंपरिक उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्यरत असल्याचे सांगत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी व्यासपीठावर रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडा मित्र मंडळ रायगडचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष संकेत वडके तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या भाषणात दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रायगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानाचा घालून दिलेला आदर्श शासनाच्या धोरणांत प्रतिबिंबित होत असून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कोणत्याही अडथळ्यांशिवाय निरंतर सुरू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यंदा पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी सांगितले की, कमी पाऊस किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तरी शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शासकीय तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदाता बळीराजाचाच आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच, रायगडासह महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांची कीर्ती वृद्धिंगत करण्यासाठी शासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रास्ताविकात रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी रायगड किल्ला आणि पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व पुनरुज्जीवनासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे ८० ते ८५ एकर जागा संपादित केली असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पास अंतिम मान्यता देऊन निधीत वाढ करण्यात यावी.

रायगड किल्ल्यावरील सखल भागातील भिंती, तटबंदी आणि पडझड झालेल्या ऐतिहासिक संरचनांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, जेणेकरून संवर्धनाची कामे वेगाने पूर्ण होतील, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील पडझड झालेल्या विश्रामगृहाच्या जागी आधुनिक व सुसज्ज विश्रामगृह उभारण्यात यावे, जेणेकरून गडावर येणाऱ्या शिवभक्तांना अधिक चांगल्या मुक्कामाची सुविधा उपलब्ध होईल, अशी मागणी त्यांनी केली. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी केलेल्या समन्वयपूर्ण कार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सोहळ्याच्या प्रारंभी रायगड पोलीस दलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पालखी सोहळा राजसदरेवर दाखल झाला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, पोवाडे, लोकनृत्ये, युद्धकला सादरीकरणे, शिवप्रेमी पथकांचे आकर्षक कार्यक्रम आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर शिवमय झाला.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महावितरण तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून आरोग्य, पिण्याचे पाणी, वाहतूक, पार्किंग, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

0000000


Join WhatsApp