Pune | Sat, 20 June 2026

No Ad Available

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Admin | 5 views
आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १९ : पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने 5 हजार 500 विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वेने, खासगी वाहनांनी आणि एसटीने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भाविकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाने व्यापक नियोजन केले आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने 5,200 विशेष बसेस चालवून तब्बल 21 लाख 95 हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सक्षम नियोजन करण्यात आले आहे.

वारीदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. सुमारे 13 हजार कर्मचारी या सुविधेचा लाभ घेणार आहे.

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे 36 हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियोजन अधिक प्रभावी होऊन भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यभरातील भाविकांनी एसटीच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख सेवांचा लाभ घेत विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून एसटी यंत्रणा संपूर्ण यात्राकाळात अहोरात्र सेवेसाठी तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000


Join WhatsApp