
मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘संचार साथी’ पोर्टल व अॅपपविषयी माहिती देणारी, मुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत सोमवार, 17 नोव्हेंबर ते गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत, दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच “News on AIR” या मोबाईल अॅपवर ऐकता येईल. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.
भारतभरातील 120 कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने मे 2023 मध्ये ‘संचार साथी’ हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्यांच्या मोबाईल कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणूक टाळण्यासाठी संरक्षण, तसेच सुरक्षा धोक्यांच्या नोंदीची सुविधा उपलब्ध झाली आहे. संचार साथी पोर्टलवर नो युवर मोबाईल कनेक्शन, आपल्या नावावर नोंद असलेली सर्व मोबाईल कनेक्शन्स पाहण्याची सुविधा, हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करण्याची सोपी प्रक्रिया तसेच व्हेरिफाय आयएमईआय मोबाईलचा आयएमईआय क्रमांक सत्यापित करण्याची आदी महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासणे, अनावश्यक किंवा फसवणुकीची शक्यता असलेल्या कनेक्शनपासून बचाव करणे आता अधिक सोयीचे होणार आहे. त्याअनुषंगाने संचालक जांभळी यांनी या पोर्टल व अॅपचा वापर कसा करायचा, त्यातील सुविधांचा सुरक्षिततेसाठी कसा लाभ घ्यायचा याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
०००
जयश्री कोल्हे/स.सं
