Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

‘भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Admin | 9 views
‘भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

  • ‘भारत पर्व २०२६’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग
  • ‘भारत पर्व २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. ३१ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स व ग्यानपथ, नवी दिल्ली येथे २६ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘भारत पर्व २०२६’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दालन उभारुन सहभाग घेतला होता.भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडले. महोत्सवामधील पर्यटन विभागाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. ‘भारत पर्व २०२६’मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, पर्यटन स्थळी जाण्याची सोय, उपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, युनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारक तसेच अनेक पर्यटकांनी पर्यटन विभागाच्या दालनाला भेट दिली. पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांमधील घटकांनी महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात रुची दाखविली. दालनाच्या सर्जनशील सादरीकरणाबाबत तसेच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व विविध पर्यटन क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय  खंदारे म्हणाले की,भारत पर्व’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. राज्यातील गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे आदी पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी विशेष फायदा झाला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाबाबत जाणून घेण्यास अधिक रुची दाखविली. याचा पर्यटन क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या नक्कीच फायदा होईल.

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की,भारत पर्व’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांद्वारे पर्यटन सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली. यामुळे विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटन वाढीसाठी मदत मिळेल. तसेच सदर महोत्सवाच्या माध्यामातून महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ


Join WhatsApp