
मुंबई, दि. २३ : आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन संशोधनावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) ७५ व्या दीक्षान्त समारंभास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विद्यार्थ्यांना उत्तम व्यक्ती घडवणारे आणि जीवनात यशस्वी करणारे शिक्षण असले पाहिजे. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी विविध क्षेत्रात नवीन संशोधन केले पाहिजे. ज्या क्षेत्रांत आपण आयातीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रात नवीन संशोधन करून भविष्यात त्या क्षेत्रात निर्यात वाढवण्यावर भर द्यावा.
सुमित्रा महाजन म्हणाल्या की, ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने महिलांसाठी शिक्षणाचे विविध मार्ग खुले करून दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक संकटांवर मात करून जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्य केले, त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजे. या कार्याचा सन्मान होत असल्याचा अभिमान आहे. असे सांगून त्यांनी महर्षी कर्वे यांच्या सामाजिक कार्याचीही आठवण करून दिली.
सुमित्रा महाजन यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व महिलांच्या सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट्.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. तसेच या दीक्षान्त समारंभात पदवी, पदव्युत्तर, पदविका विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात योगदान दिलेल्या डॉक्टरेट पदवीधारकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वर्षी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाला नॅककडून ‘ए’ श्रेणी प्राप्त झाली असून अध्यापन, संशोधन, सुशासन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाच्या वतीने अनेक शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी प्रास्तविक भाषणात दिली.
00000
काशीबाई थोरात/विसंअ/
