Pune | Sun, 19 April 2026

No Ad Available

विधानपरिषदेत सदस्यांनी जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin | 16 views
विधानपरिषदेत सदस्यांनी जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २४ : विधानपरिषदेत सदस्यांनी आपल्या कार्यकाळात जनहिताचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले असून, लोकांच्या भावना, अपेक्षा आणि समस्या सभागृहात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांप्रती भवना व्यक्त केल्या.

विधानपरिषदेतील नऊ सदस्यांच्या निरोप समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विधानपरिषद हे केवळ चर्चा आणि वादविवादांचे व्यासपीठ नसून लोकशाही मूल्ये जपण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे प्रभावी माध्यम आहे. सदस्यांनी विविध संसदीय आयुधांचा योग्य आणि प्रभावी वापर करून सार्वजनिक हिताचे मुद्दे सातत्याने सभागृहात मांडले. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी सभागृहाची परंपरा जपत केलेले योगदान भविष्यातही संसदीय कामकाजासाठी आदर्श राहील.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा देतो. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग २४ वर्षे सभागृहात काम करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उपसभापती म्हणून त्यांनी शिस्त, कणखरपणा आणि वैचारिक परिपक्वतेच्या जोरावर सभागृहाचा लौकिक वाढवला. महिला नेतृत्वासाठी त्यांनी एक वेगळी दिशा निर्माण केली असून, त्यांच्या कार्याची नोंद विशेष आदराने घेतली जाईल.

अमोल मिटकरी यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, विविध विषयांवरील त्यांचे सखोल ज्ञान, प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. विशेषतः संत साहित्य, सामाजिक प्रश्न आणि शेतीविषयक मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने प्रभावी मांडणी केली.

शशिकांत शिंदे यांनी कामगार प्रश्नांवर ठाम भूमिका घेत सभागृहात आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून ओळख निर्माण केली, असे नमूद करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कामगार चळवळ अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची त्यांची बांधिलकी यापुढेही कायम राहील. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. राजेश राठोड यांनी शैक्षणिक, सामाजिक, कृषी आणि सहकार क्षेत्रातील कामासोबत वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडली. संदीप जोशी यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली, दादाराव केचे यांनी विकासकामांच्या पाठपुराव्यात आपली वेगळी शैली दाखवली, तर संजय केनेकर यांनी विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास संसदीय कार्यातून पुढे नेला, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ


Join WhatsApp