Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

Admin | 19 views
विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारींची विशेष तपास पथकामार्फत चौकशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. ९ : जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित विभागातील अधिकारी सुनील कुशिरे यांची वाल्मी या संस्थेत बदली करण्यात आली असून २००८ ते २०१४ या कालावधीतील प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात विधानपरिषद सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सदस्य ॲड. अनिल परब यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती देताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, मे. वॉटरफ्रंन्ट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने निविदा भरताना वाहनाची खोटी शपथपत्रे व इतर बनावट कागदपत्रे, आरसी बुक दाखल केलेली होती. विभागामार्फत रत्नागिरी शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. सद्यस्थितीत पोलीस तपासाअंती कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आले आहे. या कंपनीच्या २००८ ते २०१४ या कालावधीतील राज्यातील प्रकल्पांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरु आहे. या कंपनीला मंजूर करण्यात आलेल्या मौजे सारंगवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा संग्राहक तलाव व पुरसंरक्षक योजनांच्या प्रकल्पाची कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रण विभाग, अकोला यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली असून बहुतांश घटकांची कामे सर्वसाधारणपणे योग्य प्रकारे करण्यात आल्याचे दिसून आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

 

महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

नागपूर, दि.९: महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला व बाल सुधारगृहाच्या सुरक्षा व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री तटकरे यांनी सांगितले, महिला व बाल सुधारगृहात तसेच महिला वसतिगृहात असणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या बाल सुधारगृहातून मुलांचे पलायनाचे प्रमाण ०.२९ टक्के तर महिलांचे तीन टक्के इतके आहे. बाल सुधारगृहातून पलायनाचे प्रमाण शून्य टक्के पर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे भरलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जी पदे भरण्याची प्रक्रिया प्रलंबित आहेत त्यांची भरती एक महिन्यात करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.

उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहातील घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री तटकरे यांनी सांगितले, उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहात घटना घडली त्या दिवशी एकूण १२ महिला प्रवेशित होत्या. त्यापैकी तीन बांगला देशातील, एक बिहार, एक गुजरात, एक पश्चिम बंगाल तसेच सहा महिला महाराष्ट्रातील होत्या. वसतिगृहाची क्षमता १०० असली तरी त्यावेळी केवळ २१ महिला तिथे राहत होत्या. सुरक्षा व्यवस्थेत एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. एफआयआरनुसार प्रवेशित महिलांनी दोन्ही सुरक्षा कर्मचारी यांना मारहाण करून लॉक करून सहा फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत दिसत आहे.

पळून गेलेल्या १२ महिलांपैकी ११ महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (आयटीपीए) अंतर्गत कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध ठिकाणांवरून सुटका करून संस्थेत दाखल करण्यात आल्या होत्या. एक महिला ठाणे परिसरातून दाखल करण्यात आली होती. सर्व महिला १९ ते ५० वयोगटातील होत्या.

उल्हासनगर येथील वसतिगृहातील सुरक्षा वाढवण्यासाठी भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. वसतिगृहातील सुरक्षा, सोयी सुविधा, कर्मचारी भरती या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येईल. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. वसतिगृहात १२ मंजूर पदे असून सात पदे भरलेली तर पाच पदे रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त केलेली चार पदे कार्यरत आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी गृह विभागाकडे अधिक पोलीस बंदोबस्त मागितला असल्याचेही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

०००

एकनाथ पोवार/स.सं

 

संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती देण्यात येणार; निधी उपलब्धेकरीता प्रस्ताव शिखर समितीकडे– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

नागपूर,दि.९ : संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा  प्रस्ताव शिखर समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे मंत्री गोरे यांनी दिले.

संत मुक्ताई मंदिर विकासासाठी सुरुवातीला 9.8 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर निधी वितरित करण्यात आला असून त्या कामांना सुरुवातही झाली आहे. कामास गती न मिळाल्याने खर्चात वाढ झाली असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

मंत्री गोरे म्हणाले की, पूर्वी शासनाने 25 कोटींच्या आराखड्यालाच मान्यता दिली होती. परंतु आता बांधकाम विभागाने तयार केलेल्या नव्या विकास आराखड्याला शिखर समितीच्या मान्यतेनंतरच पुढील उर्वरित मंदिराचे काम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

 

राज्यात ६०४ आपला दवाखाने सुरू; उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

नागपूर, दि. ९ : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल. राज्यात सध्या या योजनेंतर्गत ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्र राज्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, सचिन अहिर, प्रसाद लाड, परिणय फुके, निरंजन डावखरे, रणजितसिंह मोहिते,  राजहंस सिंह, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी असल्याने ती अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.

मंत्री आबिटकर म्हणाले, राज्य शासनामार्फत ७०० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगाच्या निधीतून २,२३२ नागरी  आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ६०४ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व १,६४३ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राची संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखरेख केली जात आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये फार्मसिस्ट नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगून मंत्री आबिटकर म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या प्रभावी कामकाजासाठी सर्व संबधित सदस्यांसमवेत बैठक घेतली जाईल.

०००

एकनाथ पोवार/स.सं


Join WhatsApp