Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

Admin | 16 views
विधानपरिषद प्रश्नोत्तरे

वाहतूक नियोजन आणि इ-चालानबाबत धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १० : मुंबई आणि परिसरात वाढती वाहनसंख्या विचारात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना इ-चालान देण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत विविध राज्य आणि देशांमधील चांगल्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले.

वाहतूक हवालदार खासगी मोबाईलवरून फोटो काढून इ-चालान देत असल्याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांनी हवालदारांना यासाठी कॅमेरा देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले.  याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे जाहीर केले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, सतेज पाटील, भाई जगताप, ॲड. अनिल परब, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

वाहतुकीच्या नियोजनाबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये दुचाकींचा विचार झालेला नाही. त्यात बदल करता येईल का हे तपासून पाहिले जाईल. वाहन चालकांना इ-चालानचा संदेश तातडीने मिळेल, यासाठी यंत्रणा अद्ययावत केली जाईल. ठराविक कालावधीनंतर प्रलंबित दंडाची वसुली करता येत नसल्याने लोकअदालत घेऊन ॲम्नेस्टी योजनेच्या माध्यमातून तडजोडीने 50 टक्के दंडाची वसुली केली जाईल. भविष्यात दंडाची रक्कम फास्टॅगला जोडता येईल का हे देखील तपासून पाहिले जाईल. मुंबईतील झोपडपट्टी भागातील वाहनधारकांना वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांची वाहने रस्त्यावर उभी राहतात, त्याबाबतही धोरणामध्ये विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी वाहतूक हवालदारांना खाजगी मोबाईल वरून फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगून चंद्रपूर येथे अशा प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागपूर, दि. १० :- एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील  ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे.  राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय,भाई जगताप, अनिल परब, प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, राज्यात बससेवेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. तीन हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पाच हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच येत्या पाच वर्षात टप्प्या टप्प्यात २५ हजार बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महामंडळाच्या कामगारांची देय असलेले देणी देण्यास निधीची कमतरता भासणार असे परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले, एस टी महामंडळाच्या कामगारांची देय असलेली  ४ हजार १९० कोटी इतकी रक्कम देण्यात येत आहे. यासाठी निधीची पुरवणी मागण्यांमध्ये मागणी करण्यात आली आहे. यामुळे कामगारांची थकबाकी येत्या सहा ते आठ महिन्यांत कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर एसटी महामंडळाचे बस डेपो व जागा विकसित करण्यात येणार आहेत. याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही वापरण्यात येईल. एसटी महामंडळांचे उत्पन वाढविण्यासाठी अनेक स्रोत निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिवहन विभागाने हळूहळू डिझेल बसेस हटवून पर्यावरणपूरक पर्यायी बसचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

अकोला जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्यात येईल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

नागपूर, दि. १० : अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या सीएसआर निधींतर्गत बांधलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय खोडके, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, टी पॉईंट ते बाळापूर या दरम्यान नॅशनल हायवे बांधला जात आहे. या रस्त्यावरून महानिर्मिती कंपनीमधील राखेची वाहतूक होते. या बांधकामाधीन रस्त्याचे २२ जुलै २०२५ रोजीच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून सध्या या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या कामाचा अंतिम चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजित १४.५० कोटींच्या खर्चापैकी आतापर्यंत ७.१५ कोटी एवढी रक्कम कंत्राटदारास अदा करण्यात आलेली आहे. या रस्त्याचा दर्जा चांगला असून या रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार झालेला नाही. तथापि, सदस्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबत चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 


Join WhatsApp