Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

विधानपरिषद लक्षवेधी

Admin | 19 views
विधानपरिषद लक्षवेधी

मासळी परवानाधारकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. ९: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (मासळी मंडई) इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक ठरविण्यात आल्याने रिक्त करुन निष्कासित करण्यात आली. सध्या महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये मासळी परवानाधारकांचे पुनर्वसन करण्यात येत असून तेथे त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सुनील शिंदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, प्रसाद लाड, श्रीमती उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज मंडई 1972 मध्ये बांधण्यात आली होती. ती धोकादायक ठरल्याने उच्च न्यायालयाने देखील एका जनहित याचिकेचा निकाल देताना या ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिका अधिकारी, व पदाधिकाऱ्यांवर असेल, असे आदेश दिले. यामुळे ही इमारत रिक्त करून निष्कासित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे नोंदणी केलेल्या मासळी व्यावसायिकांचे  नवीन इमारतीत पुनर्वसन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारे रॅम्प, धक्का आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले जातील.

हाताने मासळी सोलणाऱ्या महिलांना त्रास होऊ नये यासाठी हँड ग्लोव्हज मागविण्यात येत असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या अनुषंगाने उपस्थित झालेल्या एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/


Join WhatsApp