Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

विधानपरिषद कामकाज

Admin | 14 views
विधानपरिषद कामकाज

शेतकरी आणि शेती समृद्ध करण्यासाठी ठोस आणि सर्वसमावेशक उपाययोजना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

नागपूर, दि. 11 : ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ हे घोषवाक्य घेऊन शेतकरी आणि शेती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस आणि सर्वसमावेशक उपाययोजना राबविल्या आहेत, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने केलेल्या मदतीसंदर्भात सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ॲड. जयस्वाल यांनी शासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असून यासाठी निधीची अडचण भासू दिली जाणार नाही.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, यावर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे सुमारे ९६ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१ हजार कोटी रुपयांहून अधिकचे ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त विहिरींना ३० हजारांपर्यंत मदत देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत देण्यात आली आहे. राज्यातील नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने तातडीने मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांसाठी निधीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, राज्यातील १.७१ कोटी शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली असून यामुळे यापुढे वारंवार केवायसीची आवश्यकता भासणार नाही. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणार आहे. राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकरी, त्यांची पत्नी, मुलगा तसेच अविवाहित मुलगी यांना लाभ दिला जात आहे. शेतकऱ्यांसह शेतमजूर हाही महत्वाचा घटक असल्याने शेत मजुरांच्या सुरक्षेसाठी शासन संवेदनशील असल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेत मजुरांनाही संरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी यावेळी दिली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/


Join WhatsApp