Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य द्या – सभापती प्रा. राम शिंदे

Admin | 1 views
विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य द्या – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. १६ : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी, यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानभवन, येथे 2026 च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात बैठक सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अधिवेशन काळात सुव्यवस्था आणि सुरक्षितता याबाबत  दक्षता घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वाहनतळ व्यवस्था, अधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, उपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, उपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी, विधानभवन परिसरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अखंडित पाणी पुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, रेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व विषयांसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.

अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश नियंत्रण कडक ठेवावे, वाहनतळ व्यवस्था उचित असावी तसेच सुरक्षा, स्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यात, असे स्पष्ट निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, सार्वजनिक बांधकाम विभागाने सभा मंडप व पूरक कामे तात्काळ पूर्ण करावीत, विद्युत विभागाने अखंडित सेवा सुनिश्चित करावी तसेच उपहारगृह अधिवेशन काळात अधिक वेळ सुरू ठेवून खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासावी, असे निर्देशही देण्यात आले. रेल्वे विभागाने दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या प्रवासाची सुविधा अग्रक्रमाने उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे वार्तांकनासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी मंडप आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित कराव्यात, असे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

बैठकीस महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. गोविंद चौधरी, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबेपाटील तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 श्री. जितेंद्र भोळे, सचिव-2 मेघना तळेकर इटकेलवार, सचिव-4 श्री. शिवदर्शन साठ्ये व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

मोहिनी राणे/स.सं.


Join WhatsApp