
कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील -महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
नागपूर, दि. १२ : राज्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मधील २४६ वरून २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत खाली आले आहे. एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालविकास, आरोग्य, आदिवासी विकास या संबंधित विभागांची टीम तयार करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी कुपोषणामुळे बालकांच्या होणाऱ्या मृत्यूसंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय खोपडे, प्रवीण दरेकर, श्रीमती चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २०२४ मधील ०.७९ टक्क्यांच्या तुलनेत २०२५ मध्ये ०.४१ इतके कमी झाले आहे. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये देखील कुपोषण मुक्तीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, स्वस्थ माता, सशक्त बालक जन्माला यावेत यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न करण्यात येतात. दुर्गम भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातात. स्वच्छतागृहे चांगली केली जात आहेत. सर्व प्रसूती रुग्णालयातच व्हाव्यात यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. आयसीडीएस मार्फत राज्यात ४२,६०२ गरोदर माता आणि बालकांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तथापि, राज्यात बालकांचे मृत्यू केवळ कुपोषणामुळे होत नसून त्यासाठी विविध कारणे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- राज्यमंत्री पंकज भोयर
नागपूर, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने प्रसार व्हावा, याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार असल्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.
सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. यावेळी सदस्य अमोल मिटकरी, ज.मो.अभ्यंकर यांनी चर्चेत सहभागी झाले होते.
राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा योग्य, सखोल व प्रेरणादायी परिचय मिळावा याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.
राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे ‘द राईज ऑफ मराठा’ हे स्वतंत्र प्रकरण सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्याचे पंकज भोयर यांनी सांगितले.
एनसीईआरटीकडे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अधिक समृद्ध माहिती समाविष्ट करावी, अशी राज्याची मागणी असल्याचे कळविण्यात आले आहे.
राज्यातील शाळांमध्ये ‘शिवचरित्र वाचन’ उपक्रमाची कल्पना सकारात्मक असल्याचे सांगत, शिक्षण विभागाशी चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना, छत्रपती शिवाजी महाराज महा-राजस्व समाधान शिबिरे या योजनांच्या माध्यमातून सरकार प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सुविधा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
००००
राजू धोत्रे/विसंअ
