
धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परंडा तालुक्यातील पुरबधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व उपस्थित वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे व तहसीलदार नीलेश काकडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवरांनी यावेळी करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पुरबाधित घराची पाहणी केली. या वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी श्री.शिंदे यांचेकडे बाधित वस्तीतील लोकांनी केली असता नक्कीच आपले पुनर्वसन करण्यात येईल, याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले की, बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तात्पुरती लवकरच मदत करण्यात येईल. तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल. अटी व निकषांमध्ये शिथिलता आणण्यात येईल. मदतीपासून कोणीही वंचीत राहणार नाही. जमीन पूर्णता खरडून गेली आहे, याबाबत मदतीचे निकष बदलविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

श्री.शिंदे पुढे म्हणाले की, बाधितांना आता मदतीची आवश्यकता असून प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत करावी. नैसर्गिक आपत्ती कोसळली असून अशा प्रकारच्या संकटांना न घाबरता धीर धरावा. शासन म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. केंद्र आणि राज्य शासनाची मदत देऊन जनतेला आधार देण्यात येईल. पंचनाम्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर आल्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे श्री.शिंदे यांनी पुरबधितांना आश्वस्त केले.

करंजा गावाचा भाग असलेल्या शिंदे वस्तीतील पोलीस पाटील बाळासाहेब चांगदेव शिंदे यांच्या घराचे पूर्णता नुकसान झाले असून श्री.शिंदे यांच्यासह पालकमंत्री श्री.सरनाईक, आरोग्यमंत्री श्री.आबिटकर व आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी त्यांच्या घरात जाऊन संसारोपयोगी साहित्याच्या नुकसानीची पाहणी केली.
तसेच जवळच्या करळेवस्तीला एनडिआरएफच्या बोटीने जाऊन भेट दिली व बाधित वस्तीतील लोकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यांना धीर देऊन मदतीची ग्वाही दिली.
००००
